Tuesday 7 November 2017

अविस्मरणीय धमाल ट्रेक...

"देवकुंड वॉटरफॉल" ट्रेक
जिल्हा- पुणे
ठिकाण-ताम्हिणी घाट
दिनांक-५ नोव्हेंबर २०१७
श्रेणी- मध्यम

  
"फोना"च्या २० ऑगस्ट २०१७ च्या धुवाधार कातळधारा ट्रेक नंतर आम्ही ट्रेकर्स तुफानी ट्रेकची आतुरतेने वाट पाहात होतो.  यावर्षी ऑगस्ट नंतर अगदी आताआतापर्यन्त पाऊस पडत होता त्यामुळे सगळे गडकिल्ले घसरडे झाले होते. नको नको त्या अपघाताच्या बातम्या ऐकायला आणि वाचायला मिळत होत्या त्यामुळे आधीच काळजी म्हणून"फोना" टीमचा सप्टेंबर मधला तोरणा ट्रेक ट्रेकलीडर्सने कॅन्सल केला गेला होता त्यामुळे आम्ही सगळेच हिरमुसलो होतो. परंतु ऑक्टोबर मध्ये अशीही दिवाळी आणि मुलांच्या परीक्षा असल्याने वेळ कशी गेली समजले नाही. फोनाचा ७७वा देवकुंड ट्रेकचा ५ नोव्हेंबरचा दिवस उजाडला आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही कारण सासुरवाशिणीला जेवढी सासरची ओढ असते त्याहून जास्त तिला माहेरची  ओढ असते तसे आम्हा ट्रेकर्सचे होत असते कारण ट्रेक हे आमचे जणू माहेरच होऊन बसले आहे. आम्ही गृहिणी तसेच जॉब करणारे मुले-मुली रोजच्या रहाटगाड्यातून बाजूला होऊन इथे येऊन विसावतो. जर प्रत्येकाला आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर महिन्यातून किमान एक ट्रेक हा हवाच आणि तो "फोना" सोबतच असावा. 
पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात ताम्हिणी घाटामध्ये भिरा धरणाजवळ देवकुंड वॉटरफॉल आहे. तळेगाव पासून सुमारे ८० किलोमीटर अंतरावर भिरा धरण आहे. आमची फोना ट्रेकर्सची ३२ जणांची बस सकाळी ६ वाजता तळेगाव-निगडी-चिंचवड-डांगे चौक- मुळशी मार्गे ताम्हिणी घाटातून भिरा धरणाकडे निघाली. डांगे चौकचा स्टॉप गेल्यावर आम्हाला एक छानसे सरप्राइज मिळाले. भूमकर चौकामध्ये आमच्या बसमध्ये चक्क परदेशी पाहुण्या चढल्या.(पोलंड)त्या चुकून आमच्या बसमध्ये चढल्या नव्हत्या तर त्यांनी फोना टीमची प्रसिद्धी आणि ख्याती ऐकून फोना ट्रेकसाठी ऑनलाईन बुकिंग केले होते. परदेशी पाहुण्या आमच्यासोबत ट्रेक करणार याचा आम्हाला आंनद झाला खरा परंतु आमचे किडूकमिडूक इंग्लिश यांना समजले तर बरे. गमतीचा भाग सोडला तर फोना टीम मध्ये खूप सारे इंग्लिश एक्स्पर्ट होते. ऋतुजाइराकविता आणि इतर बरेच मेंबर्स त्या दिवशी आमचे ट्रान्सलेटर होते. थोडे पुढे गेल्यावर प्रवास सुखाचा व्हावा यासाठी श्रीफळ फोडून प्रवासाला नेहमी सुरुवात होते त्याप्रमाणे आम्ही निघालो. अजून अर्धा तास पुढे गेल्यावर एका ठिकाणी क्षणभर थांबून इडली चटणी चा नास्ता केला आणि पुढे नेहमीच्या ठिकाणी शिवसागर हॉटेल मध्ये चहा घेऊन आम्ही ताम्हिणी घाटची सफर सुरु केली. 

मला तर बस मध्ये गप्प बसले की चक्कर यायला सुरु होते. एकतर गप्पा हव्यात नाहीतर मग अंताक्षरीदमशेराज असं काहीतरी वरचा खाऊ खातो तसं चरायला हवेच. वेळ वाया न घालवता आम्ही अंताक्षरी सुरु केली. प्रत्येक ट्रेकला फोनाला एक नवा गायक किंवा गायिका मिळते तसे यावेळी आम्हाला आकाशने एक नवीन "मुंबई आयडॉल" दिला होता जणू. एकटा गायला तरी आक्खी बस हालत होती.त्याच्यापुढे आम्ही तर किड्या मुंग्याच झालो होतो. अशा वेळी मला आमच्या गॅंग मधील तालासुरात गाणारे प्रतिक पेंढारे,विवेक,स्नेहल खोल्लमअस्मितानिकिता, आणि बर्याच ट्रेकर्सची आठवण आलीच. आमचे ट्रेक लीडर्स नेहमी म्हणतात की नव्या मेंबर्सना आपली कला सादर करण्याचीलपलेले गुण बाहेर काढण्याची संधी दिली पाहिजे, सर तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी सांगते मी पण एक साधीगरीब ट्रेकरच आहे. आम्ही प्रत्येक कलाकाराला ट्रेक दरम्यान कला सादर करण्याची संधी देतोच आणि कौतुकदेखील करतो."वैसे तो हर गली में हमारे सिवाय तो पत्ता भी हिलने की जुर्र्त नहीं करता और यहा  देखो हम तो यु ही खालीपिली बदनाम होते जा रहे  है." (गम्मत केली) प्रतीक ठाकरे आपने तो फोना में आ के समा बांधके रखा.  

अशा  धमाल करणाऱ्या नवीन ट्रेकर्सचे फोना टीम कायम स्वागत आणि कौतुक करते. अंताक्षरी चालू असली की ट्रेकचा आणि प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळून जातो. मुळशी धरणाला वळसा घालित ताम्हिणी घाट अंताक्षरीच्या तालावर वाजतगाजत सकाळी १०च्या सुमारास आम्ही भिरा-पाटणूस गावात पोहोचलो. इथून वर उभा दिसलेला खुट्टा पाहून मला जीवधनगड जवळच्या वानरलिंगी सुळक्याची आठवण झाली. भिरा-पाटणूस हे गाव ७० घरांचे आहे. १३ गावांची ग्रामपंचायत एकाच गावात चालते ते गाव या गावापासून जवळ आहे. तसेच या गावात एकही मंदीर नाही.सध्या एका ठिकाणी मंदिराचे बांधकाम चालू असलेले आढळले. तसेच ट्रेकर्सच्या बसेस,कारबाईक अशी अनेक वाहनांची गर्दी दिसली. मी याठिकाणी पहिल्यांदाच जात असल्याने मला काही अंदाज नव्हता. परंतु एखाद्या ठिकाणची माहिती नसेल तर अजून जास्त उत्सुकता असते त्यामुळे जास्त आनंद उपभोगता येतो असे माझे मत आहे. अर्थात ट्रेक लीडर्सना सगळी माहिती असते त्यामुळे आम्ही निश्चिन्त असतो. लीडर्सने ट्रेकिंगबद्दलच्या सूचना केल्यावर लगेच शिवगर्जना करून ट्रेकला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर पावसात कोसळणारे मोठमोठे धबधबे आता छोटे छोटे ओढे  होऊन मंजुळ आवाज करीत वाहत होते. आम्ही भिरा धरणाच्या कडेकडेने जात होतो. एकीकडे हिरवेगार डोंगर एकीकडे भिरा धरणाचा अथांग जलाशय मनाला आणि शरीराला गारवा देत होता. अंधारबन ते भिरा डॅमच्या सुमारे १३-१४ कि.मी. च्या  ट्रेक दरम्यान आम्ही किती डोंगर दऱ्या पालथ्या घातल्या ते आता इथून दिसत होते.  एकीकडे कुंडलिका दरीएकीकडे ताम्हिणी घाटाचा पाठमोरा चेहरा दिसत होता. जणू काही ताम्हिणी रागावून बसला होता.

मध्यम श्रेणीचा ट्रेक आहे असे सांगण्यात आल्याने आम्ही जरा रमत गमत फोटोग्राफी करत निघालो होतो. भिरा धरणापासून सुमारे २ तासाच्या अंतरावर देवकुंड वॉटरफॉल आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई जसे अगदी जवळ गेल्याशिवाय दिसत नाही तसेच हा देवकुंड वॉटरफॉल ताम्हिणी घाटामध्ये अगदी लपून बसला आहे. याला भेटायचं म्हणजे याच्या पायापाशी जायला हवे. इथला परिसर म्हणजे प्लस व्हॅलीचा परिसर होय. आम्ही मागे प्लस व्हॅली ट्रेक केला तेव्हा प्लस व्हॅलीच्या शेवट आहे त्याच्या खाली काय असावे असा प्रश्न मला नेहमीच पडायचा आज त्याचा उलगडा झाला. अंधारबन सारखे ते जंगल पार करत आम्ही ट्रेकर्स चालत होतो. अधे मध्ये कुडाचे(कारवीचे) एखादे कौलारू घर दिसत होते. येथील गावकऱ्यांची भातशेतीची खाचरे दिसली. तसेच अधे मध्ये लिंबू पाणीसरबते विकणारे तेथील गावकरी दिसले.आपल्या सोबत किमान २ लिटर पाणी हवेच. तसेच उन्हापासून सौरक्षण म्हणून एखादी टोपीपंचाहातात एखादी काठी असावी.आणि नेहमीप्रमाणे ट्रेकिंगचे बूट आणि जेवणाचा डबा असलेली सॅक हवी तसेच खूप सारा खजूर,चॉकलेट गोळ्यासारखा खाऊ असावा. जसा माझ्याजवळ नेहमी असतो तसाच यावेळी आमची नवी मेंबर इरा हिच्याजवळ असावा.
यावर्षी पाऊस ऑक्टोबरपर्यँत पडत असल्याने पाझरणारे झरे आम्हाला आता तरी दिसत होते. स्वच्छ पाणी होते. तसेच इतरही खूप ट्रेकिंग ग्रुप तिथे आलेले होते. तरीही आपले घरचे पाणी सोबत असावेच. वाटेमध्ये एका मोठ्या ओढ्यावर लाकडी पूल दिसला. पावसात शेतकरी लोक याचा जाण्यायेण्यासाठी वापर करत असावेत. सध्या तर फक्त एक व्यक्ती फोटोपुरती उभी राहू शकत होती. ट्रेकर्सने आणि माणसांनी जाऊन जाऊन तो पूल मोडकळीस आला असावा असे आढळले.


सकाळी  १० वाजता निघालेलो आम्ही ट्रेकर्स रमत गमत गेल्यामुळे १ वाजेपर्यंत देवकुंड धबधब्याजवळ पोहोचलो. तिथे पोहोचल्यावर कोणालाही फोटोग्राफीचा आणि त्या बर्फासारख्या थंड पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. आम्ही आमच्या सगळ्यांच्या सॅक बाजूला सुरक्षित जागी एकाच ठिकाणी ठेवल्या. आणि पाण्यात उतरलो. पाणी अतिशय थंड आणि खोल होते.परंतु पाण्यात उतरल्यावर ते पाणी नॉर्मल वाटत होते. तसेच त्या ठिकाणी खूप गर्दी होती त्यावेळी मला माझ्या गावाजवळ ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत त्याची प्रकर्षाने आठवण झाली.परंतु वज्रेश्वरी हे  पर्यटनस्थळ आहे म्हणून गर्दी असते. देवकुंड हा ट्रेकस्पॉट असून इतकी अफाट गर्दी होती हे विशेष आहे. 



याठिकाणी सगळ्यात आधी मॅगडालेना आणि डोराटा यांनी पोहोण्यासाठी उड्या मारल्या तसेच आमच्यात अस्मिता आणि इरा पट्टीच्या पोहोणाऱ्या होत्या तरीही पाणी खूपच खोल असल्याने फक्त अस्मिता सावंतला पाण्यात पोहण्याची परवानगी मिळाली. वेल-डन  मॅगडालेना आणि डोराटा आणि अस्मिता. आमच्यातील मुलांनी आणि लीडर्सनेदेखील पोहण्याचा आंनद घेतला परंतु आमच्या टीममधील माशासारख्या पोहणाऱ्या पोरींकडे सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. कीप इट अप गर्ल्स.  ताम्हिणी घाटातील अफाट प्लस व्हॅलीचा जिथे शेवट होतो तिथे देवकुंड या भल्यामोठ्या धबधब्याचा उगम होतो असे म्हणता येईल. वरून पडणारा पाण्याचा प्रवाह आणि खाली ५० ते ६० फूट खोल निळेशार पाणी आणि प्रचंड जनसमुदाय आणि त्यात आमची फोनाची टीम ट्रेकच्या शिस्तीची मारून बाजी मारून गेली. अश्या वेळी लई भारी वाटतं. फीलिंग प्राऊड.  
न पोहता येणारे आम्ही तिथल्या मोठ्या खडकावर उभे राहून मनसोक्त फोटोग्राफी केली. त्यात मुंबईच्या आयडॉलला खडक आणि सावकाश असे काही शब्दच समजत नव्हते कसे  व्हायचे रे प्रतीक तुझे ?  आमचे ब्लॉग वाच आणि हे सगळे मराठी शब्द शिकून घे तू. पावसाळी ट्रेक दरम्यान उत्तम पोहणारे मेंबर आम्हाला मिळाले. आम्ही अर्ध्या तासात लगेच काही जणी थंडी लागत असल्याने उन्हात आम्ही गारठलो होतो ते कपडे सुकवायला उन्हात उभे राहिलो तोपर्यंत लगेचच फोना बॅनर फोटो झाला. 
आम्ही वरून इतके थांबा थांबा ओरडत असताना आमच्यासाठी कोणी थांबले नाही. यावरून समजते की पाहुणे आले की घरच्यांचा नेहमीच विसर पडतो. हाहाहाहा असो. अश्या वेळी आमचे लाडके ग्रेट फोटोग्राफरसायंटिस्टप्रोफेसर  मिस्टर रोहित नागलगाव यांची खूप आठवण झाली. ते सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय बॅनर फोटो काढतच नाहीत.किमान ते त्यांच्या टीमच्या  ट्रेक ब्लॉगरला तरी नाही विसरत. आमची फोटोग्राफीला न कंटाळणारी आणि उत्तम फोटो काढणारी फोटोग्राफर गॅंग प्रतीक-विवेक-आनंद, श्री महेश पाठक सर,(ब्लॉग गुरु कहा हो आप?) प्रशांत गुंडराहुल दर्गुडे  प्रत्येक ट्रेकला येत जारे उगाच कोणाला फोटोसाठी हा जी हा जी करायला नको.    

परंतु आम्ही पण काही कमी नव्हतो लगेच देवकुंडला रामराम करून झपाझप मोठमोठाले खडक पार करून मंदार सरांना गाठून पहिले बॅनर फोटो काढून घेतला तेव्हा कुठे डोकं शांत झाले. भुकेने जीव व्याकुळ झाला होता. सगळ्यांनी आपापले जेवणाचे डबे काढून जेवण करून मग नवीन ट्रेकर्सच्या ओळखी करून घेतल्या. मला घरातून ट्रेकसाठी परवानगी मिळते हे माझे अहोभाग्य आहे.परदेशी पाहुण्या आमच्यात  खूप छान पद्धतीने मिसळून गेल्या होत्या अर्थात फोना टीमला सगळ्यांना सामावून घेण्याची सवय आहे म्हणूनच हे शक्य झाले. फोना टीम एक ngo किती प्रकारचे कार्य करते हे सांगितल्यावर परदेशी पाहुण्या खूप खुश झाल्या त्यांनी फोना टीमचे  खूप कौतुक केले. ३ च्या सुमारास ट्रेक उतराईला सुरुवात केली. ट्रेकहून परत येताना त्या ठिकाणाचा निरोप घेताना माझे स्वतःचे अंतःकरण खूप जड होते. तरीही आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. ट्रेक उतरताना मात्र सुरुवातीला इतरही खूप ग्रुप असल्याने प्रचंड गर्दी झाली होती. फोना टीमचे ट्रेकर्स कोणते पटकन समजत नव्हते परंतु त्यातील बरेच लोकांनी सॅंडलचप्पलफ्लोटर असे पायात घातले असल्याने आम्ही क्षणात ओळखले की हा आपला ग्रुप नाहीये कारण फोना टीम ट्रेकिंग शूज शिवाय ट्रेकला येण्याची परवानगी देत नाही. ट्रेकला चढाई करताना नेहमी जास्ती वेळ लागतो. आणि उतरताना नेहमी कमी वेळ लागतो. इतर ग्रुप फार हळूहळू उतरत असताना आम्ही काही मेंबर्स वाऱ्याच्या वेगाने चढत उतरत आलो कारण हा किल्ला नसल्याने चढ उतार दोन्ही करावयास लागत होते. 
देवकुंड ट्रेक हा सप्टेंबरनंतरच्या कोणत्याही महिन्यात करण्यासारखा ट्रेक आहे इथे वर्षात बाराही महिने पाणी असते. परंतु हा ट्रेक जर जून ते ऑगस्ट मध्ये केला तर पाण्यात बुडण्याचा वाहून जाण्याचा खूप मोठा धोका संभवतो. यावर्षी अतिवृष्टीमुळे जुलै ऑगस्टच्या दरम्यान गेलेल्या काही ट्रेकर्सना आपले प्राण गमवावे लागले आणि काही जण या ठिकाणी अडकले होते नंतर त्यांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यासाठी वेगळ्या ग्रुपला पाचारण करावे लागले होते अश्या अनेक बातम्या वाचल्या आणि ऐकल्या होत्या. त्यामुळे ट्रेक छोटा असो मोठा असो पूर्ण माहिती असल्याशिवाय आणि ज्या ट्रेक स्पॉटला जाणार आहोत त्याठिकाणी काही रिस्क नाही ना याची खात्री केल्याशिवाय फोना लिडर्स ट्रेक आयोजित करीतच नाहीत. ग्रेट टीम. याचे सगळे श्रेय आमचे ग्रेट लीडर्स श्री. मंदार थरवळ आणि श्री .मनोज राणे, रोहित सर आणि निकाळजे सर यांना जाते.  
देवकुंड जवळून ३ वाजता निघालेलो आम्ही सगळेच वाऱ्याच्या वेगाने चालत होतो. फोटोग्राफी आणि रमत गमत ट्रेक तर आम्ही करतोच करतो परंतु निसर्गाचे निरीक्षण आणि त्याच बरोबर सौरक्षण करू शकलो तर ते उत्तम ठरेल. देवकुंड वरून येताना एक खेदाची गोष्ट जाणवली ती म्हणजे या जंगलात या ट्रेक रूटवर प्लास्टिकच्या बाटल्या भरमसाठ प्रमाणात आढळल्या त्या आमच्या ग्रुपच्या ट्रेकर्सने उचलून आणल्या.या चांगल्या कार्याचे नेतृत्व श्री ज्ञानेश्वर लष्करीश्री. कृष्णा शुक्ल, हजारो साप पकडून सुरक्षित रित्या जंगलात सोडणारे श्री निकाळजे सरदीपिका मुळेविनोद मुळेयांनी केले. तसेच श्री मंदार थरवळश्री राणे सर आणि इतरही बऱ्याच ट्रेकर्सने निसर्गाच्या सौरक्षणासाठी खारीचा वाटा उचलला. तोच प्लास्टिक कचरा आम्ही तेथील ग्रामस्थांच्या स्वाधीन केला. देवकुंड ट्रेक दरम्यान झालेल्या अपघातामुळे इथे ट्रेकिंगची माहिती नसलेल्यांना ट्रेक करण्यास मनाई आहे त्यामुळे त्यांना सांगितले की ट्रेकर्सना गावाच्या हद्दीतून सोडताना प्लास्टिक कचरा न करण्याच्या सूचना द्या. 



आम्ही  भिरा-पाटणूस गावात ५ वाजताच पोहोचलो आणि ट्रेक पूर्ण झाला परंतु आमच्यातील एक ट्रेकर थोडी मागे राहिली आणि तिला चालता येत नव्हते त्यामुळे आम्हाला १ तास थांबावे लागले. लीडर्स नेहमी सांगतात की आपली स्वतःची क्षमता तपासून पाहून मगच ट्रेकला यावे. तरीही काही लोक ऐकत नाहीत आणि मध्यम श्रेणीच्या ट्रेकला सुद्धा विनाकारण खोळंबा होतो. तिथे आलेल्या ट्रेकर्सची एक बाईक घेऊन त्या ट्रेकरला आणले गेले.  परंतु तोपर्यंत आम्ही तेथील सनसेट अनुभवला आणि फोटोग्राफी केली. ६ वाजता आम्ही उरलेला खाऊ खाऊन परतीच्या प्रवासाला निघालो.
मॅगडालेना आणि डोराटा वर्षानुवर्षे आमची ओळख असल्यासारख्या आमच्यात खूप छान मिक्स झाल्या होत्या. हीच तर फोना टीमची खासियत आहे. परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आमच्याकडे २ ते अडीच तास होते. सगळेच जण थकलेले होते. तरीही अगोदर फोनच्या बॅटऱ्या चार्ज करून आपापले फोटोज एकमेकांकडून घेतले. आणि  हळूच अंताक्षरी सुरु केली परंतु नुसती गाणी न गाता  रॅपिड फायर राऊंड घेतला आणि खूप जास्त धमाल आली. टीम जिंकायच्या जोशात परस्पर विरोधी टीमचा मर्डर होतो की काय असे वाटत होते इतकी धमाल आली.   
"गोली आणि उलझी" ची उल्झन सुटता सुटेना. शेवकर सर, सुरेखा आणि इतर सगळेच  ट्रेकर,"धमाल आणलीत  गोलीच्या आणि उलझीच्या गाण्याने." ती गम्मत सांगून कोणालाही समजणार नाही.  रॅपिड फायरची मजा प्रत्यक्षच अनुभवावी आणि त्यासाठी फोनाच्या ट्रेकला यावे लागते.  नंतर मात्र अंताक्षरी सुरु केल्यावर सगळ्यामधील गायक बाहेर आला. "जयजय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा सारखी गाणी पूर्ण पाठ असणारे फोना टीमचे अवधूत गुप्ते श्री मंदार सर हॅट्स ऑफ" तसेच हिंदी आणि मराठी गाणी तोंडपाठ असणारे आणि रिमिक्स गाणी येणारे फोना टीमचे महमद रफी श्री मनोज राणे सर हॅट्स ऑफ, मुंबई आयडॉलने तर श्वास पण नसेल घेतलाप्रतीक ठाकरे तुझ्या गाण्यामुळे माझ्या घशाला जरा आराम मिळाला. आयती भारी-भारी गाणी ऐकायला मिळाली. कधीतरी काहीतरी आयते मिळाले. शेवकर सरसंजय गोर्डेराहुल शिंदेइराचे बाबा कुलकर्णी सर मधूनच एखादे गाणे गात होतात पण एक नंबर गात होतात. आकाश तुझे "अब जाने की जिद् ना करो" हे गाणे भारी होते.   राणे सर,विनोददीपिकाऋतुजा,(छान गायलीस ऋतुजा) इरा, साचिन दीक्षित सर, तुषार शिंगारे, मयूर लंकेश्वर(छुपा रुस्तम छान गाणे गायलेस तू सुद्धा)अस्मि, दिनेश,कवितासुरेखामंदार सरआकाशहर्षद,सरिता,ट्रेक दरम्यान आणि प्रवासात धमाल आली.ज्यांची नावे माहित नाहीत त्यांनी देवकुंड ट्रेक ग्रुपवर टाकावीत मी नंतर ऍड करेन.   ट्रेक उत्तम रीतीने पार पडण्यासाठी  लीडर्स आणि आलेल्या सर्व ट्रेकर्सचे सहकार्य आणि सहभाग अतिशय महत्वाचे असते. देवकुंड ट्रेक  सगळ्यांच्या सहकार्य आणि सहभागामुळे अतिशय उत्तम रित्या पार पडला. Thank you our guest trekkers magdalena and  dorota and all trekkers. 



17 comments:

  1. Nice blog. Everything covered - Enjoying nature, safety in nature, taking care of nature.

    ReplyDelete
  2. मस्त ..खूप छान लिहिलंय👍

    ReplyDelete
  3. लिहिलेलं वाचून पुन्हा एकदा ट्रेकचा अनुभव मिळाला ��

    ReplyDelete
  4. मी ट्रेकला येऊ शकलो नाही..पण ह्या ब्लाॅगमुळे खुप काही अनुभवायला मिळाल...👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. व्वा....सुंदर लिहिलय....मस्तच

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
    Replies
    1. I don't have any words to explain it's really speechless thank you to bring a part of your crew I am waiting for next trip thank you so much its feelimg like a family😊😊😊😊😊

      Delete
  7. Chaan aahe lekh... Andharban chya majhya baryach athvani athavlya. Thanks

    ReplyDelete