Wednesday 4 December 2019

राजा ट्रेक


राजा ट्रेक
हरिश्चंद्र गड आणि तारामती शिखर ट्रेक
उंची - ४८५० फूट
प्रकार - गिरिदुर्ग
चढाईश्रेणी - मध्यम
ठिकाण- नगर जिल्हा
डोंगररांग - हरिश्चंद्राची डोगररांग

हरिश्चंद्रगडची थोडक्यात माहिती-महाराष्ट्रात नगर जिल्ह्यामध्ये अकोले तालुक्यात पाचनई गावाजवळ हरिश्चंद्र हा गड आहे.  खरेतर इथे पोहोचण्यास चार-पाच वाटा आहेत. खिरेश्वरकडील वाट-टोलार खिंड, सावर्णे-बेलपाडा-साधले असा घाटमार्ग, नळीचीवाट, आणि पाचनई गावाजवळून जाणारी वाट. हरिश्चंद्रगड-तारामती शिखर समुद्रसपाटीपासून सुमारे ४८५० फूट उंचीवर आहे. खिरेश्वर आणि पाचनई ही पायथ्याची गावे आहेत. हरिश्चंद्रगड म्हणजे नगर जिल्ह्याचे महाबळेश्वर आहे. ठाणे, पुणे आणि नगर यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा पर्वताप्रमाणे दिसणारा प्रशस्थ डोंगर म्हणजे हरिश्चंद्रगड, महाराष्ट्रात सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई आहे तसेच आजोबा,कात्राबाई ही उंच शिखरे आहेत तारामतीदेखील एक उंच शिखर आहे
खाद्या स्थळाचा अथवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड होय. हा गड पूर्व-पश्चिम असा पसरला आहे. पूर्वेला तारामती शिखर तर पश्चिमेला कोकणकडा असा हा एक अद्वितीय निसर्गाविष्कार आहे. हरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो
थोडक्यात इतिहास-साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी नटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नटलेला, नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्राचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात मत्स्यपुराणात आढळतो.महाराष्ट्रातील इतर पारंपरिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रीतील अत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. येथील मंदिर आदिवासी कोळी महादेव जमातीचे कुलक असून महादेवाच्या नावावरूनच जमातीची ओळख आहे. संपूर्ण सह्याद्री पट्ट्यातील सर्व महादेव मंदीरही या जमातीचे प्रतीक आहेत. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली. असा हा गडाचा थोडक्यात इतिहास सांगता येईल.
ठिकाणे
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर :  मंदिराच्या प्रांगणात  भिंत आहे. या  भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच ‘मंगळगंगेचा उगम’ असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार अमृततुल्य आहे.
केदारेश्वराची गुहा : मंगळगंगेच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर डाव्या हातास एक गुहा लागते. याला केदारेश्वराची गुहा असे म्हणतात. या गुहेत मीटर उंच आणि मीटर लांब असे शिवलिंग आहे. यात कमरभर पाणी आहे. ही गुहा खरंतर चार खांबावर तोलली होती परंतु सध्या एकच खांब शाबूत आहे. याच गुहेत एक खोलीही आहे. या शिवलिंगाला प्रदक्षिणा घालावयाची असल्यास थंडगार पाण्यातून जावे लागते.हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या-अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे म्हणतात 
कोकणकडा : कोकणकडा म्हणजे हरिश्चंद्रगडावरील सर्वात मोठे आकर्षण. कोकणकडा म्हणजे गिर्यारोहकांना आकर्षणाचे स्थान. अर्ध्या किलोमीटर परिघाचा,वाटीसारखा अर्धगोल आकाराचा काळा भिन्न रौद्रभीषण कोकणकडा हा एकमेव अद्वितीय असावा. संध्याकाळच्या वेळी सूर्यास्ताचा नयनरम्य सोहळा या कड्यावरून पहाण्यात जो आनंद आहे तो अवर्णनीयच आहे.
तारामती शिखर : तारामती शिखर गडावरील सर्वात उंच शिखर आहे. साधारणतः उंची ४८५० फूट. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. आजुबाजुला अनेक गुहा आहेत. यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल,घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात.( उपयुक्त माहिती डोंगरयात्रा - आनंद पाळंदें यांच्या पुस्तकातून आणि  नेटवरून घेतली आहे.)
दिनांक ३०नोव्हेंबर- डिसेंबर २०१९  या तारखेला माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुप आयोजित १०३ वा हरिश्चंद्रगड ट्रेक म्हणजे थाळीमध्ये गुलाबजामून असे असते हा ट्रेक म्हणजे आमच्यासही पर्वणीच असते. कारण यावर्षीचा उशिरापर्यंत पडत असलेला पाऊस आता कुठे थांबलाय आणि थोडीशी थंडी पडू लागलीये. त्यामुळे खूप अति थंडीही नाही आणि अति ऊनही नाही त्यामुळे तेथील सूर्योदय सूर्यास्त शांतपणे अनुभवता येतात. पुण्यापासून सुमारे १६५ किमी अंतरावर हरिश्चंद्रगड आहे. ३० नोव्हेंबरला  शनिवारी सकाळी ११च्या  सुमारास आमची “माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे” ग्रुपची बस ५४ ट्रेकर्सना घेत-घेत निगडी-नाशिकफाटा -राजगुरूनगर,बोटा-ब्राह्मण वाडा- कोतुळ मार्गे पाचनई गावात म्हणजे गडाच्या पायथ्याशी पोहोचली. मध्ये बसचा टायर पंक्चर झाल्याने पोहोचायला जरा उशीरच झाला त्यामुळे कोकणकडयांवरचा सूर्यास्त अनुभवता येणार नाही हा अंदाज आल्याने आम्ही मध्ये थांबून सूर्यास्ताचा आनंद  घेतला. सध्या लवकर अंधार होत असल्याने आमचा रात्रीचा ट्रेकचा अनुभव घेता येईल याचा सर्वांना मनोमन आनंद झाला. पोहोचल्यावर लगेचच लीडर्सनी ट्रेकसंदर्भात महत्वाच्या सूचना देऊन संध्याकाळी ७च्या सुमारास आम्ही हेड टॉर्च, सॅक, आणि इतर गरजेच्या साहित्यासहित ट्रेकला सुरुवात केली. कात्रज ते सिहंगडच्या ट्रेकनंतर माझा नाईट ट्रेक झाला नव्हता त्यामुळे मी मनोमन खुश होते. रात्रीच्या ट्रेकला ट्रेकचे अंतर भरभर पार होते परंतु मी माझा डीएसएलआर नेट नसल्याने नाईट ट्रेकदरम्यान फोटोग्राफीला जास्त वाव नसतो. मी बसमधून सूर्याला मोबाईल कॅमेऱ्यात कैद करीत होते.

गडाच्या पायथ्याला अंधार गुडूप झाल्याने नवीन ट्रेकर्सना थोडी धास्ती वाटत होती की ते ट्रेक करू शकतील की नाही. परंतु ग्रुप लीडर्सची नवीन ट्रेकर्सना दिलासा देण्याची रीत खूप छान असते ते सगळ्यांचा उत्साह वाढवत असतात.मला माझ्यापेक्षा जास्त क्षमता असलेले, जास्त कुवत असलेले जास्त वेग असलेले आणि मजा मस्ती फोटोग्राफी करीत जाणारे ट्रेकर्स आवडतात. अंधार असल्याने आणि नवीन ट्रेकर्स खूप असल्याने कोण कोणासोबत चालतेय ते लक्षात येत नव्हते परंतु आमचे लीडर्स एक पुढे एक दुसरा मध्ये आणि एक दोन मागे असे सर्वांना सोबत घेऊन येण्यासाठी थांबलेले असतात.
ट्रेकर्सहो,रात्रीचा ट्रेक असला की  आपल्याजवळ थोड़े जास्तीचे सामान असते आणि आपल्याला ते गडावर चढून घेऊन जायचे असते.ट्रेकर्सहो एक लक्षात ठेवा,आपल्याला मदत करण्यास कोणी नाही आपल्याला एकट्यालाच आपली सॅक घेऊन फोटोग्राफी करीत मजा मस्ती करीत परंतु तरीही शिस्तीत गड चढायचा आहे याची एकदा मनाशी गाठ बांधली की आपला आत्मविश्वास वाढतो.आपल्यासोबत कोणीतरी आपल्या मदतीला आहे असे मनात आणले की आपला आत्मविश्वास कमी होतो.जाताना सुरुवातीलाच तपकिरी डोळ्यांचे मोठे काळेकुट्ट रानमांजर आणि पायाखाली चालणारा विंचू अशा दोघांनी आमचे स्वागत केले. म्हणता-म्हणता डोक्यावरच्या बॅटरीच्या उजेडात गडावरील हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरापाशी पोहोचलॊ. आम्हाला उशीर झाल्यामुळे आणि मोबाईलवर संपर्क झाल्यामुळे आमच्यासाठी जेवण बनवणारा भास्करचा भाऊ आम्हाला तिथे घ्यायला आला होता. इतक्या लोकांचे जेवण बनवून वाया जाऊ नये याची काळजी त्याला होती तशी आम्हाला देखील होतीच. मंदिरापासून अर्ध्या तासाच्या अंतरावर कोकणकडा आहे.नवीन ट्रेकर्स मधील सुरुवातीला हा ट्रेक पूर्ण करू शकणार नाही असे वाटणारे सर्व ट्रेकर्स कोकणकडयावर भास्करच्या कारवीच्या घराजवळ आले. गडावर जेवणाची सोय होते परंतु मोठा ट्रेक ग्रुप असेल तर तिथे त्यांना फोन करून तसे कळवावे लागते.त्या अंधाऱ्या जंगलात एक जरी वळण चुकले तर दिशाभूल होऊ शकते. आणि मग ढुंढते रहो परिस्थती होऊ शकते त्यामुळे माहिती नसणार्यांनी तेथील गाईड किंवा वाटाड्या घ्यावा. त्या रात्रीच्या  अंधारात आमच्या बॅटरीच्या उजेडात ट्रेकर्सची रांग अप्रतिम दिसत होती. ५४ जणांचा मोठा ग्रुप असल्याने कसलेही भय वाटत नव्हते.मंदिराच्या पुढे कोकणकड्यापर्यँत जाताना हजारो ट्रेकर्सच्या जाण्याने वाट तुडवून तुडवून जमीन झिजून झाडांची मुळे वर आलेली आहेत त्यामुळे रात्रीच्या ट्रेकला काही ठिकाणी काळजी घ्यावी.संध्याकाळी च्या सुमारास सुरु केलेला ट्रेक आम्ही सर्व  ट्रेकर्सनी सव्वानऊ ते साडेनऊच्या सुमारास पूर्ण केला. दिवसा कमीतकमी तास तरी लागतात ही वाट चढण्यास.रात्र असल्याने फोटोग्राफीमध्ये जास्त वेळ वाया गेल्याने आम्ही लवकर पोहोचलो. पोहोचल्यावर पाहतो तर तिथे अनेक ट्रेकर्स मंडळी तंबू ठोकून भास्करच्या घराजवळ शेकोटी पेटवून हिंदी मराठी गाणी गाण्याचा आस्वाद घेत होती.



भास्करच्या घरात भात, भाजी, कढी तयार होते गरम भाकरी बनवणे चालू होते. झोपडी लहान असल्याने आम्ही - पंक्ती करून जेवलो. इतक्या उंच कड्यावर त्या कारवीच्या घरात गरम गरम जेवणाची मजा काही औरच. गेल्यावर्षी गडावर प्लास्टिकचा कचरा थर्माकॉल कचरा तसेच सहली नेणारे दारू पिऊन दारूच्या बाटल्यांचा खच पाडत असत. गडाच्या स्वच्छतेची वाट लागली होती. त्यामुळे वनविभागाने सगळ्यांनाच कॅम्पिंग करण्यास बंदी आणली होती. सध्या तंबू लावू देतात परंतु कॅम्पफायर करण्यास बंदी आणली आहे. त्यामुळे गडावर आता बिसलेरी पाणी मिळत नाही.  पाणी फक्त हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराजवळ मिळते तेव्हढेच. कोकणकडा इथून अर्ध्या पाऊण तासाच्या अंतरावर आहे त्यामुळे आपल्या जेवणाची सोय करणाऱ्या लोकांना स्वयंपाकाला आणि प्यायला पाणी आणावयास इतक्या दूर जावे लागते ते देखील छोट्या पायवाटेने डोंगर ओलांडून डोक्यावर हंड्याने पाणी आणावे लागते. त्यामुळे आपण माणुसकी म्हणून त्या जेवणाला नावे  ठेवता उलट त्या जेवण बनवणाऱ्या मावशी-काकांना सलाम करायला हवा. आपण जरी पैसे दिले तरी त्या कार्यामागे किती कष्ट घ्यावे लागतात याचा अंदाज आणि जाणीव गड चढून गेलेल्या ट्रेकरलाच येतो.त्यामुळे पाणी सुद्धा जपून वापरले. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर आपण अशा अनेक गोष्टी शिकून येतो

आमचे थकलेले पाय आमच्या तंबूकडे निघाले. भास्करने काही तंबू आधीच तयार करून ठेवले होते. आम्ही सोबत आणलेले दोनतीन तंबू सेट करून सगळे तंबूमध्ये गेले. रात्रीचे बारा वाजत आले  होते. पाऊस आत्ताच थांबल्याने जमिनीत खूप ओलावा होता आणि गावात देखील ओलसर होते. सुकलेली लाकडे नव्हती. त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचवता आम्ही आमचा इको फ्रेंडली कॅम्प फायर लावला (मोबाइलचा फ्लॅशलाईट चालूं करून त्यावर पाण्याची बाटली भरून ठेवली) आणि ओळख परेड करून हिंदी-मराठी गाण्याची महफिल रंगवली एकच्या सुमारास सगळे आपापल्या तंबूमध्ये गेले.
रात्री थंडी वाढली होती आणि वाऱ्याचा वेग वाढल्याने टेन्ट नुसता फडफड करीत होता.कुणीतरी तंबुवर काही मारतय का असे वाटत होते.  पहाटे गजर व्हायच्या आतच सगळे ५ला उठून तंबूमध्ये खुदुखुदू हसू लागले होते मानते कोंकणकड्यावर जायच्या ओढीने पटापट आवरण्यासाठी भास्करच्या घरात गेलो ब्रश करून चहा घेतला त्यावेळी एका ठिकाणी छोट्या शेकोटीचा उजेड दिसला. आम्ही लगेच तिकडे आनंदाने उडत जाऊन शेकोटीवाल्याना बिनधास्त विचारले आम्ही तुमच्या शेकोटीजवळ एक मिनिटे शेकतो तुम्ही आमचा फोटो काढून आम्हाला पाठवा सह्याद्रीने आपल्याला इतके साहस,धैर्य दिलेच आहे. सर्व ट्रेकर्स म्हणजे आपलेच कुणीतरी सखेसोबती आहेत असे आपण आपसूकच वागतो. ती शेकोटी म्हणजे अगदी गवताच्या काड्यांची होती. एका क्षणात विझेल अशी होती परंतु आमची कॅम्प फायरची इच्छा तर आम्ही पूर्ण करून घेतली.
तंबूजवळ येऊन आवरून नास्ता करून कोकणकड्याकडे निघालो.कोकणकडा म्हणजे प्रेमाच्या प्रेमात पाडणारा असा सखा आहे.कोकणकड्याचे सौंदर्य पाहून कोणीही त्याच्या प्रेमात पडेल असाच तो आहे. एखाद्या प्रेयसींप्रमाणे वेड लावणारा मोहात पाडणारा असा तो आहे.इथे कसलेही रेलिंग लावलेले नव्हते आता कड्याला एका ठिकाणी भेग गेल्याने अपघात होऊ नये यासाठी रेलिंग लावले आहे. तरीही सर्व ट्रेकर्स रेलिंगच्या पुढे जाऊन बसतात आणि फोटोग्राफी करतात तेथील शांतता अनुभवतात तेव्हाच परतीचा मार्ग धरतात.
आपण जेव्हा त्याच्या कवेत जाऊन बसतो तेव्हा जणू तो   त्याच्या हाताच्या मिठीने घट्ट पकडून ठेवतो कोणालाही खाली पडू देत नाही तरीही आपण आपली सावधगिरी बाळगलेली केव्हाही चांगली  कोकणकड्यावरून समोर नाणेघाट आणि माळशेज घाटाची रांग नागिणीसारखी वळणाची दिसत होती. एकीकडे नाफ्ता आणि सीतेचा डोंगर मान वर करून खुणावतो.  वातावरण जरासे धूसर असल्याने पूर्ण स्पष्ट दिसत नव्हते. परंतु हळूहळू सूर्य वर येऊ लागला तसे सह्याद्रीचे कडे स्पष्ट दिसू लागले. पावसात सुमारे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे.असे ऐकले आहे.  
कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रूप पहावे लागते. स्वच्छ हवा असली तर येथून कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. ज्यांनी चारी वाटांनी ट्रेकिंग केले आहे आणि गडाचा सखोल अभ्यास केला आहे त्यांच्या लेखात वाचले आहे की, हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून अंतर्गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो. आजूबाजूची शिखरे फोटोमध्ये आपण आपला फोटो छान येण्यासाठी जसे आपली मान उंचावतो त्याप्रमाणे हे शिखरे मान उंचावत असल्यासारखे वाटत होते. कोकणकड्यावरून उठावेसेच वाटत नव्हते. यावेळी कोकणकड्याचा तो अर्धगोलाकार वक्र पाहण्यासाठी कोकणकड्याच्या पश्चिमेला आम्हा ट्रेकर्सना नेऊन लीडर्सने उत्तम माहिती दिली. कोकणकड्यावर फोटोग्राफीसाठी रंगीबेरंगी फुले आणि मनमोहक नजारे पाहावयास मिळतात. 



चला दिवाळी आली आता मोती स्नानाची वेळ झाली तसेच सूर्यकिरणे वर आली आता बॅनर फोटो काढायची वेळ झाली. यावेळी मुलींची संख्या भरपूर होती आणि सगळे ट्रेकर्स प्रत्येक बाबीसाठी हौशी होते. जे हौशी नव्हते ते आमचे फोटोग्राफीचे वेड पाहून फोटोग्राफीचे वेडे झाले. हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे. आपण निसर्गापुढे फिके पडतो आणि निसर्गावर नकळत प्रेम करायला शिकतो.


त्यानंतर पूर्ण ट्रेकर्सचा बॅनर फोटो घेऊन आम्ही कोकणकड्याचा जड अंतःकरणाने निरोप घेतला. एखादा मनोरा रचावा  त्याप्रमाणे बॅनर फोटोसाठी सगळे बसले होते. सगळे कसे शिस्तीत पार पडत होतेगड खूप स्वच्छ आढळला. तिथून आल्यावर त्या मावशींना धन्यवाद देऊन तंबूमधून आमचे सामान घेऊन तंबूजवळ बॅनर फोटो घेऊन हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिराकडे निघालो.

रात्रीच्या वेळी जी वाट पार केली ती आता दिवसा दूर वाटत होती. १० च्या सुमारास मंदिराजवळ पोहोचलो मारुतीच्या तात्पुरत्या घरात सॅक ठेवल्या आणि १०:३० च्या सुमारास तारामतीशिखरावर चढाई सुरु केली. आमच्यातील काही ट्रेकर्स तिथेच थांबले बाकीचे सगळे ट्रेकर्स तारामती शिखरावर निघाले. इथे चढाव खूप आहे परंतु इथे चापड्याची(विषारी साप) भीती असते त्यामुळे सगळे पटापट चढाई करतात.जाताना डाव्या हाताला पिंपळगावजोगा धरणाचा प्रशस्त जलाशय पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. आजूबाजूला असंख्य सह्यकडे आणि हा जलाशय पाहून मन भारावून आणि सुखावून जाते. थोडे वर गेल्यावर थोडासा कठीण रॉकपॅच येतो तिथे जरा सांभाळून चढावे लागते. एका बाजूला दरी आणि दुसऱ्या बाजूला देखील शिखराची दरीच आहे.
असे वाचनात आले आहे की तारामती शिखरावरून शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्र,सिद्धगड,माहुली,कलाडगड, भैरवगड, (मोरोशी), तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.कुठेही रेलिंग लावलेले नाही. वर छोटे पठार आहे - शिवलिंगे पाहावयास मिळतात. तारामती शिखर चढताना एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने उतरता येते. तोल जातो परंतु जरा सांभाळून उतरले तर गंमत पण तेवढीच येते. अर्ध्या तासाच्या आत  शिखर उतरता येते. मागच्या वेळेस हरिश्चन्द्रेश्वराच्या मंदिरात जाताना तिथे आम्हाला श्री जयवंत नारायण  कठाळे हे गृहस्थ भेटले त्यांनी त्यांचा भन्नाट अनुभव आम्हाला कथन केला होता. पौर्णिमेला शंकराच्या पिंडीवर आपोआप दीपप्रज्वलन झालेले त्यांनी पाहिले आहे. या परिसरात  १२ शिवमंदिरे आहेत. या मंदिराच्या ठिकाणी आल्याने इतकी शक्ती मिळते की वर्षभर ही शक्ती टिकते.येथील मंदिरांमध्ये प्राकृत मराठी भाषेत शिलालेख लिहिले आहेत ते आपण वाचू शकतो.गडांचा राजा हरिश्चंद्रगड हे त्यांचे पुस्तक  लवकरच लिहून पूर्ण होऊन प्रकाशित होणार होते आता झाले असेल. त्यात आपल्याला गडाविषयी, मंदिरांविषयी इत्यंभूत माहिती मिळेल असे त्यांनी म्हंटले होते. मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आढळले. आम्ही गाभाऱ्यात जाऊन पिंडीचे दर्शन घेतले. पिण्याचे गार आणि स्वच्छ पाणी इथे एकाच ठिकाणी मिळते. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे असे वाचले आहे.

मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली घळ आहे. या घळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या.तारामती शिखरावर जाऊन आल्यावर तेथील हरिश्चन्द्रेश्वर मंदिर,पुष्करिणी आणि शिवलिंग असलेली गुहा पहिली आणि फोटोग्राफी केली. इथे आंघोळ करण्यास आणि पोहण्यास सक्त मनाई आहे कारण एकतर ही नैसर्गिक संपत्ती आहे दुसरे म्हणजे इथे पोहणाऱ्यांचा पाण्यात असलेल्या वेलींमुळे खडकांमुळे जीव देखील गेला आहे.तरीही इथे अंघोळ करणारे असमंजसच म्हणावे लागतील. 
आता मात्र भुकेने पोटात कावळे ओरडू लागले होते. त्यानंतर मारुतीच्या घरी पिठलं-भाकरी,वरण भात,पापड,मटकीची चवदार रस्साभाजी, लोणचं असा फक्कड जेवणाचा बेत केला. घर लहान असल्याने वीस-वीसची पंगत बसत होती.
एक एक पंगत जेवून उठत होती तसतसे ट्रेकर्स पंधरावीस मिनिटे थांबून गड उतरण्यास सुरु करीत होते. माझ्या सेलफ़ोनची बॅटरी आता संपल्याने फोन बंद करून सपासप पावले टाकून आता पायाला भिंगरी लावल्यासारखे उतरत होतो.उतरताना
एका ठिकाणी आकाशात रॉकेट जाताना दिसले. लहानपणी हे रॉकेट पाहताना अतिशय कुतूहल वाटायचे. मला तर आजही कुतूहल वाटते.  ट्रेक संपत आला की पाठीवरची सॅक आपोआप जड व्हायला लागते पाय जड होतात तसे आमचे झाले होते.
पाचनई मार्गे उतरताना एक ओढा आहे तिथे एक पूल बांधला आहे. पावसात हा ओढा दुथडी भरून वाहतो. ट्रेकर्सना अडथळा येऊ नये यासाठी हा आकाराचा पूल स्थानिक जिल्हा परिषदेकडून बांधला आहे. गडाच्या पायथ्याच्या शेवटी काही ठिकाणी रेलिंग लावले आहे त्यामुळे तो खडतर चढ उतरण्यास सोपा जात होता.
पाचनईमार्गे घनदाट जंगल असल्याने गार सावलीतून उतराई करताना गारवा सुखवीत होता. एका ठिकाणी सरबत बनवून ठेवले होते त्याची मिठास काही औरच होती. साडेतीनच्या सुमारास आम्ही पायथ्याशी पोहोचलो आमच्या आधी फक्त ४५ मिनिटांमध्ये चैतन्य आणि एक ट्रेकर पोहोचला होता कारण एका ट्रेकरची आई व्हेंटीलेटरवर होती त्याला वेळेत घरी पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे पुढे पोहोचून प्रसंगावधान राखून चैतन्यने त्याला एका पुण्याच्या ट्रेकर्सच्या कारमध्ये  बसवून दिले. पाचनईमार्गे चढाई करताना  स्वच्छ ठेवण्याविषयीचे बरेचसे बोर्ड लावले आहेत ते वाचूनच पुढे जावे आणि तसे वागावे. 
एकामागून एक सर्व ट्रेकर्स आले आणि आम्ही लगेच सव्वातीनच्या सुमारास  पाचनई गावाचा निरोप घेऊन पुणेकडे रवाना झालो. यावेळी सकाळी जाताना सगळ्याच्या सगळ्या ट्रेकर्सने अन्ताक्षरीमध्ये सहभाग घेतला आणि खूपच रंगत आणली हे खूपच कौतुकास्पद होते. एकापेक्षा एक सरस, चढाओढ आणि धमाल आली होती.  तसेच परतीच्या वाटेला लागल्यावर हायवे येईपर्यंत सर्वच ट्रेकर्सने आणलेला खाऊ फस्त करून मस्त आराम केला. आणि त्यानंतर मात्र बसच्या साऊंडला मोबाईल जोडून हिंदी-मराठी-तेलुगू- कन्नड गाण्यांवर जो जबरदस्त डान्स सुरु झाला तो नाशिकफाटा येईपर्यत थांबलाच नाही.
आमच्या सोबत प्रथमच आलेले नवीन साऊथचे ट्रेकर्स ओळख नसल्याने जाताना शांत होते परंतु सर्वांना धमाल करण्याची मुभा दिल्याने बाला आणि ग्रुपने, निलेश व एव्हरग्रीन उदयसर यांनी अप्रतिम डान्सची जुगलबंदी चालू ठेवली आणि ट्रेकचा सगळा शीण घालवला. सर्वांनी एक लक्षात ठेवा कितीही थकलो तरी अन्ताक्षरीने थकवा कुठच्या कुठे पळून जातो. यावेळी लेडीज ग्रुपने देखील डान्समध्ये कमालीची धमाल आणली  पहिल्यांदाच ट्रेकसाठी आलेल्या रेखा राणे आणि खूप दिवसांनी आलेली मयुरी थरवळ यांनी अन्ताक्षरीची रंगत अजूनच वाढवली.
जाताना आमच्या बसची धूळ आमच्याच मागच्या बसला खावी लागल्याने येताना ती बस पुढे घेऊन आम्ही धूळ खाल्ली बरं का. ट्रेकर्स म्हणजे धमाल, ट्रेकर्स म्हणजे समजूतदारपणा, ट्रेकर्स म्हणजे सुंदर मन, ट्रेकर्स म्हणजे येडी जमात आणि सगळ्याचीच फिटंफाट.ट्रेक संपून पुण्याकडे निघालो तरी अनेक सह्यकडे डोकावून जणू आम्हाला टाटा करताना भासत होते. 


लीडर्सने माऊंटन एजच्या जानेवारीतील अंदमान ट्रिपची माहिती दिली. ट्रेकची जान (ड्युड)उदय सर यांनी राहिलेल्या ट्रेकर्सची ओळख परेड घेऊन अगदी व्यवस्थितरित्या प्रत्येकाचे कौतुक केले.उत्तम फोटोग्राफर राहुल दर्गुडे यावेळी हजर नव्हते.ऋषी, प्रणभ, बाला, श्रीकांत, म्यॅथी, गोपाल, अभि, गोपाळ-२,सतीश, अलीन, उदयसर, जय, संपन्ना, दिनेश, कविता, प्रेरणा, मयुरी,शिंदे, डॉ.अनिश,देव,कुणाल,मुकुंद सर, स्नेहा, शीतल निलेश, हर्षदा, सुजाता, ज्योती आणि जशींता गृपनेदेखील अतिशय सुंदर फोटोग्राफी केली. फोटोग्राफर प्रत्येकाच्या नसानसात भिनलाय. छोटे ट्रेकर राजेश्वरी कणसे आणि कृष्णा राणे याचे विशेष कौतुक. प्रत्येकाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. ट्रेक लीडर रोहित आणि नेहमीचे ट्रेकर्सहो, किंगफोर्टचा किंगग्रुपचा किंगट्रेक मिस केलात तुम्ही.  माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे ग्रुपचा १०३वा ट्रेक सर्व ट्रेकर्सच्या उत्तम सहकार्यामुळे आणि लीडर्सच्या उत्तम नियोजनामुळे यशस्वीरीत्या पार पडला. ग्रुपलीडर्सना धन्यवाद. माऊंटन एज ऍडव्हेंचर पुणे रॉक्स.





16 comments:

  1. अप्रतिम 👌 🏆

    ReplyDelete
  2. Tuze blogs vachnyasarkhe astat.
    Missed your company for this trek.
    And all the mountain edge group too!

    ReplyDelete
    Replies
    1. Thankuuu Guruji 😍..I also missed your company... during Trek 😊

      Delete
  3. Your Blogs are always informative and entertaining. Keep writing alll the best to you. I missed this trek and will miss few in future. But soon will join the team to enjoy.

    ReplyDelete
  4. thank you prashant bhavsar.
    keep treking .

    ReplyDelete
  5. अफलातुन वर्णन

    निलेश

    ReplyDelete
    Replies
    1. Thanx a lot Nilesh 😊 keep rocking
      keeping treking

      Delete
  6. राजा ट्रेक आणि राजा वर्णन व लिखाण..

    ReplyDelete
    Replies
    1. Tahnkuuu Rohit sir 😊
      keep rocking Your leadership...💫💫✨👏

      Delete
  7. मस्त,अप्रतिम वर्णन केलेय

    ReplyDelete
    Replies
    1. Thanx a lot .😊.keep treking
      Keep clicking our photographs...✨💫

      Delete