Sunday 5 January 2020

सह्यांकन -दिवस ३ रा- लेख भाग - ३


सह्यांकन -दिवस ३ रा
(वरील फोटो नारायणगडावरील सर्वात उंचावरील आहे.)  
नारायणगडाचा थोडक्यात इतिहास
पारपोली घाटाचे संरक्षण जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते.कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी आंबोली घाटवर कुडाळ वरून घाटावर जाणाऱ्या हणमंत घाटावर लक्ष ठेवण्यासाठी मनोहर- मनसंतोषगड हे किल्ले बांधण्यात आले. मनोहर- मनसंतोषगड हे जोड किल्ले त्यावरील अवशेषांसह आजही दिमाखाने उभे आहेत. या किल्ल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे या गडावर महिना वास्तव्य होते. तारकर्ली- देवबाग (मालवण) येथे समुद्राला मिळणार्या कर्ली नदीचा उगम याच किल्ल्यांच्या परीसरात होतो. ४८ किमी अंतर कापून ही नदी समुद्राला मिळते.
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील आंबाघाट, बावडाघाट, फोंडाघाट व पारपोली घाट हे चार महत्वाचे घाटमार्ग होते. यातील पारपोली घाटांचे वैशिष्ट म्हणजे याच्या माथ्यावर महादेवगड व नारायणगड हे किल्ले आहेत तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोषगड ही दुर्गजोडी आहे. कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यातील सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीत असलेल्या पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे अण्णासाहेब फोंडसावंत यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान नारायणगड हा किल्ला बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते. इ.स. १७७२-७३ दरम्यान सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी महादेवगड व नारायणगड जिंकुन रांगणा देखील घेतला तेव्हा करवीर राणी जिजाबाई यांनी स्वतः स्वारी करत महादेवगड व नारायणगड हे किल्ले जिंकुन घेतले पण काही काळातच सावंताना परत केले. यानंतर जानेवारी १७८८ मध्ये करवीरकरांनी फितुरीने घेतलेला नारायणगड इ.स.१७९३ मध्ये सावंतांना परत केला. २० नोव्हेंबर १८०४ मधील एका पत्रानुसार करवीरकरांच्या ताब्यात असलेला नारायणगड सावंतानी हल्ला करून जिंकुन घेतला. इ.स. १८२८ मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंताविरुद्ध बंड करत गडाचा ताबा घेतला पण इंग्रजांची फौज सावंतांच्या मदतीस येताच त्यांनी पळ काढला. इ.स.१८३२ पर्यंत नांदता असलेला हा किल्ला नंतरच्या काळात सावंतांची आर्थिक परीस्थिती डळमळीत झाल्याने ओस पडला तो कायमचाच. (नेटवरून साभार -सुरेश निंबाळकर)
नारायण गडाच्या बाजूला (उत्तरेला) सुळके असलेला डोंगर दिसतो. याला स्थानिक लोक गंगोत्री लगिनवाडा म्हणतात. या सुळक्यांमधील मोठ्या दंडगोलाकार सुळक्याला म्हातारीचा गुंडा (दगड) म्हणतात. त्याहून लहान सुळक्यांना नवरा नवरी म्हणतात. या ठिकाणी सांगितली जाणारी दंतकथा आणि सह्याद्रीच्या इतर भागात सांगितली जाणारी कथा यात विलक्षण साधर्म्य आहे.
नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेले आहे. ती खिंड ओलांडून आलेल्या वाटेने परत जाता समोरच्या डोंगरावर चढल्यास दाट जंगलात दोन देवस्थान आहेत. एकाला स्थानिक लोक लिंगी म्हणतात. येथे शिवलिंग नंदी आहे. दुसरे देवस्थान म्हार्ताळ या नावाने ओळखले जाते. येथे उघड्यावर काही मुर्त्या आहेत. स्थानिक वाटाड्या असल्या शिवाय योग्य जागा सापडणे अशक्य आहे.
(नारायणगड ट्रेक सुरु कारण्याआधी सूचना देताना राजनसर आणि सह्यांकनची पहिली बॅच )
आम्ही सह्यांकनची पहिली बॅच दिनांक २३डिसेंबर २०१९ रोजी सकाळी बॅचलीडर आदित्य आणि अनिकेत यांच्या सूचनेवरून रांगणा किल्ल्यावरून सकाळी ७च्या सुमारास निघालो आणि तांबेगाव या ठिकाणी मंदिरात छान माझ्या आवडीचा साबुदाणा खिचडीचा नास्ता करून नारायणगडकडे रवाना झालो. साडेअकराच्या सुमारास नारायणगडाच्या पायथ्याशी पोहोचून तेथील गावातील पाण्याच्या टाकीतून थंडगार पाणी भरून घेऊन लगेच लीडर रजन सरांच्या सूचनेनुसार ट्रेकिंग ड्रेसकोडमध्ये ट्रेक सुरु केला. 
 (साळींदराने केलेली गवतातील छोटी वाट दाखवताना कृष्णा गाईड)
वनविभाग खात्यामध्ये कामाला असलेला गावातील कृष्णा गाईड सोबत घेतल्याने त्याने खूप महत्वाची उत्तम माहिती या ट्रेकदरम्यान दिली. बिबट्या, वाघ, गवा, तरस, साळींदर, अस्वल, रानडुक्कर अश्या अनेक प्राण्यांच्या पायाचे थोडे ताजे-ताजे ठसे दाखवले. 


तमालपत्र,शिकेकाई आणि अनेक औषधी वनस्पती प्रत्यक्षात दाखवल्या. या जंगलात असलेल्या गेळेझाडाच्या फळावरून गेळे हे नाव गेळेगावाला पडले असे कृष्णा गाईडने सांगितले. प्राण्यांच्या विष्ठादेखील ओळखून तो सांगत होता. त्याचे फोटो काढायलादेखील त्या दिवशी मागणी होती. खरंच निसर्गाविषयी जाणून घेण्याच्या अशा कितीतरी चांगल्या गोष्टी आहेत. घनदाट जंगल पार करताना मधेच दरी आणि दरीतून दिसणारा कोकण भाग रमणीय दिसत होता. रांगणा गडावर ज्याप्रमाणे संध्याकाळी दरीच्या कडेकडेने पायवाट चालत होतो अगदी तशीच वाट इथे होती.

 (नारायणगडावरून दिसणारा कोकणचा प्रदेश)
नारायणगडावर दुपारी दीडच्या सुमारास पोहोचल्यावर गडावर जुन्या शिवकालीन बांधकामाचे राजवाड्याचे  वास्तूंचे आणि दगडी वस्तूंचे अवशेष दाखवले. उदा.घराचा चौथरा,वाटणासाठी वापरण्यात येणारा पाटा, इ. सध्या गडावर तसे बाकी काही पहाण्यासारखे नाही. याशिवाय गडावर कोरडा पडलेला एक साचपाण्याचा तलाव आहे. गडाच्या काही भागात ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन  उंची जवळपास २३३० फुट आहे.
 (गडावरील पुरातन वस्तूंचे अवशेष)
भुकेची वेळ झाल्याने बिस्कीट चिक्कीसारखे थोडेसे काहीतरी खाऊन गडावरून निघालो.त्या दिवसाचा गाईड कृष्णा म्हणाला की फॉरेस्ट खात्यातर्फे इथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून कोणी प्राण्यांची शिकार करतात का यावर नजर ठेवली जाते आणि कोणकोणते प्राणी या जंगलात आहेत ते यावरूनच समजते. येताना गडवाटेच्या मध्यात एका ठिकाणी पुरातन गणपती मंदिर आहे तिथे भेट दिली. मंदिराची पूर्ण पडझड झाली आहे फक्त मुर्त्या तेवढया शाबूत आहेत.इथे पितळेच्या घंटा बांधलेल्या आहेत यावरून असे समजले की गावातील मंडळी इथे येत असावीत. 
(गडाच्या मध्यात असलेले शिवलिंग)
गडावरून दुरवर पश्चिमेला असलेली मनोहर-मनसंतोष ही दुर्गजोडी, पुर्वेला कावळेसाद पॉंईंट व खाली लांबवर पसरलेला कोकण परीसर तसेच पारपोली घाट इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. मनोहर- मनसंतोष हे गड एका खिंडीमुळे एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत. यापैकी मनोहर गडावर पूरातन अवशेष आहेत तो चढण्यासही सोपा आहे. तर मनसंतोष गड हा एक सुळका असून त्यावर चढण्यासाठी प्रस्तरारोहण करावे लागते. ही किल्ल्यांची जोडगोळी आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.गेळे गावातून संपूर्ण किल्ला पाहुन परत येण्यास ३ तास पुरेसे होतात. आम्ही माहिती घेत घेत थांबत थांबत आल्याने आम्हाला सुमारे चार तास लागले. आंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड हे २ किल्ले सहज पहाता येतात.
नारायणगड गड एका खिंडीमुळे सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून वेगळा झालेला  आहे. आंबोली घाटाच्या परीसरात असल्यामुळे पावसाळ्याचे महीने सोडून वर्षभर गडावर जाता येते.
नारायण गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गेळे गावातून गडावर जातांना फारसा चढ नाही आहे. तर वाट जास्त सरळसोट काही ठिकाणी चढ -उतार असलेली आहे. माणसांचा या भागात वावर नसल्यामुळे वाटेत आजूबाजूला घनदाट अरण्य आहे. त्यामुळे नशिबात असेल तर वन्यप्राणी दर्शन देऊ शकतात. आंबोलीला येणाऱ्या आणि वेगळे काही पाहू इच्छीणार्यांसाठी हा तीन तासांचा सुंदर ट्रेक आहे.
पुण्यापासून बसने गेले तर सुमारे सात तासात नारायणगडजवळ पोहोचता येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे ठिकाण पुण्यापासून जवळपास ३६०  किमी अंतरावर आहे. मुंबई पासून सावंतवाडी ५२१ किमीवर आहे. सावंतवाडीहून एसटीने आंबोलीला जाता येते. आंबोली पासून गेळे हे नारायण गडाच्या पायथ्याचे गाव किमी अंतरावर आहे.  गेळे गावातील मंदिरा पर्यंत गाडी जाते. पुढे सिमेंटच्या रस्त्याने चालत गेल्यावर उजव्या बाजूस शेतात पायवट जाताना दिसते. या पायवाटेने गडावर जाता येते. पण गडावर जाण्यासाठी कृष्णासारखा वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहेगडावर रहाण्याची सोय नाही. जेवणाची सोय आपण स्वत: करावी.गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
(नारायणगडाच्या वाटेतून दिसणारे सुळके)
मनोहर-मनसंतोषगड तेलबैलाच्या भिंतीप्रमाणे दोन गड आहेत. 
 (वरील फोटो मी काढलेला नाही. मनोहर-मनसंतोषगड कसे आहेत हे समजावे यासाठी नेटवरून घेतला आहे.) 
गडावरून परत येताना एका ठिकाणी  कृष्णाने बाजूला दिसणारे मनोहर- मनसंतोषगड दाखवले. बघता बघता  दुपारी साडेतीनच्या सुमारास ट्रेक संपून चक्रम हायकर्सने आणलेले दुपारचे जेवण ( भाजी पोळी, लोणचे आणि चविष्ट अप्रतिम असा गाजर हलवा)करून घेतले आणि आमची बस पारगडाकडे रवाना झाली. 
(पारगडावरील मारुती मंदिर)
घाट फिरून पाचच्या सुमारास पारगडाच्या पायथ्याशी आमची बस पोहोचली. पूर्ण वजनाची सॅक घेऊन ३६०पायऱ्या वर चढून जाताना जीवावर आले होते. परंतु पारगडावरून सूर्यास्त पाहायला मिळेल या आशेने त्या ३६० पायऱ्या कधी चढून  गेलो समजले नाही. गेल्या गेल्या फडकत भगवा आणि सुंदर असे मारुती मंदिर स्वागताला होते. गेल्यावर लगेच छावणीवर जड सॅकचे ओझे खाली ठेवून फक्कड चहा घेऊन लगेच लीडर्स आमच्या बॅचला गड फिरायला घेऊन गेले.

(पारगडाची माहिती देताना भाऊ वैशंपायन)
पारगड म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांच्या हद्दीवर वसला आहे. त्यामुळे तिन्ही राज्यांचा परिसर एकावेळी पाहता येईल हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. गडाची माहिती देता देता आजूबाजूचा परिसर हिंडताना खूप प्रसन्न वाटत होते. गडाचा विस्तार तसा मोठा आहे. ढगाळ वातावरण जरी असले तरी सूर्यास्ताच्यावेळीची ती शांतता अनुभवता आली. गोव्याचा समुद्र दुरून दिसला तर दुरूनच पाय बुडवल्याचा अनुभव घ्यावा असे मनोमन वाटले परंतु ढगाळ वातावरणामुळे सूर्य नीट दिसला नाही आणि गोव्याचा समुद्रदेखील दिसला नाही.आम्ही ज्या रस्त्याने आलो तो डांबरी घाटवळणाचा  रस्ता मात्र स्पष्ट दिसला. 
तेथील डोंगररांगा मात्र दुरून स्मित हास्य करताना गोड दिसल्या.
सह्याद्रीची मुख्य रांग महाराष्ट्रामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेत सर्वात दक्षिणेकडील किल्ला म्हणजे पारगड किल्ला होय. कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुका आहे.चंदगड या तालुक्याच्या गावापासून साधारण ३० कि.मी. अंतरावर पारगड आहे. पारगड नावाचे गाव किल्ल्यामध्येच वसलेले आहे.याचे मुख्य नाव अजिंक्य पारगड असे आहे. पारगडची उंची २४२०फूट इतकी आहे. हा गिरीदुर्ग प्रकारात हा गड मोडतो. चढाईची श्रेणी सोपी आहे. जवळचे गाव कोल्हापूर असून डोंगररांग कोल्हापूर आहे.  
(पारगडावरील स्वच्छ पाण्याचे तळे)
सध्याची अवस्था व्यवस्थित पारगड हा महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व,पश्चिम उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारानंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान महत्व ओळखले आणि पोर्तुगीज, अदिलशहा सावंतवाडीचे खेम सावंत यांच्यावर कायमची जरब बसविण्यासाठी हा किल्ला वसविला. शिवाजी महाराजांच्या उपस्थितीत किल्ल्याची वास्तुशांत गडप्रवेश झाला. त्यावेळी किल्लेदार रायबा मालुसरे त्यांच्या सहकाऱ्यांना राजांनी आज्ञा केली की, ‘चंद्र सुर्य असेतो, गड जागता ठेवा. राजांच्या या आज्ञेचे पालन या गडावरील मावळर्यांीनी अद्याप पर्यंत केले आहे. स्वराज्यातील पार टोकाचा किल्ला म्हणून याचे नाव "पारगड" ठेवण्यात आले होते.
पारगडचा थोडक्यात इतिहास :गोव्याच्या पोर्तुगिजांवर वचक ठेवण्यासाठी १६७६ मध्ये शिवरायांनी या गडाची निर्मिती केली.या मोक्याच्या किल्ल्यावर त्यांनी तानाजीचा मुलगा,रायबा मालुसरे याला किल्लेदार म्हणून नेमले.गडाची वास्तुशांत गडप्रवेश यासाठी महाराजांचा या गडावर निवास होता. १६८९ मध्ये शहजादा मुअज्जम खवासखान र्यांहनी गड जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्या लढाईत तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे र्यांडना वीर मरण आले. त्यांची समाधी गडावर आहे. नंतरच्या काळात पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यात गेला. गडावर उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे ब्रिटीशांनी सुरु केलेला तनखा, गडावरीलमावळ्यांच्या  कुटुंब प्रमुखाला १९४९ सालापर्यंत मिळत होता. परंतु भारत सरकारने तो खंडीत केला तेव्हापासून सर्व गडकरी गडावर कोणतेही उत्पन्नाचे नसल्यामुळे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही गडावर स्वाभिमानाने दिवस काढत आहेत.
(पारगडावरील अस्ताला जाणारा सूर्य)
सन २००२ मध्ये विद्यमान गडवासीयांनी सरकार दरबारी केलेल्या अथक प्रयत्नाने गडावर जाण्यासाठी थेट डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याने गडाचा उत्तरेकडील कडा डावीकडे ठेवून पुढे गेल्यावर डाव्या हाताला गडाचा शिवकालीन पायऱ्यांचा राजमार्ग लागतो. सरळ जाणारी सडक घोड वाटेने सर्जा दरवाजा मार्गे गडावर जाते उजवीकडून गोव्याला जाते. शिवकालीन ३६० पायऱ्या चढून गेल्यावर सपाटीवर तोफांचे अवशेष डौलाने फडकणारा भगवा ध्वज आपले स्वागत करतो.
गडावर प्रवेश करताच तोफा आपले स्वागत करतात. डाव्या हातास मारुतीचे मंदिर आहे. मंदिरा समोरच घडीव दगडातील समाधी आहे. पुढे गेल्यावर पारगडवासियांची छोटी वस्ती सुरु होते. परंतु बऱ्याच घरांना कुलूप होते. पायवाटेने पुढे गेल्यावर शाळा त्यासमोर गडाची सदर आहे. या सदरेवरच शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे. पुढे गेल्यावर उजव्या हातास गडवासीयांनी अत्यंत जिद्दीने जिर्णोध्दार केलेले भवानी मातेचे भव्य मंदिर लागते. 
पारगडाचे आणि आजूबाजूचे निसर्गसौन्दर्य लोभस सुंदर आहे. आम्ही पारगडावरील छावणीलीडर महादेव वैशंपायन यांच्याकडून गडाची संपूर्ण माहिती घेऊन सूर्यास्त पाहून मंदिराकडे गेलो तेव्हा अंधार होत आला होता.  त्यामुळे मंदिर बंद झालं होतं परंतु आम्ही इतक्या दुरून आलोय आणि पहाटे निघणार असे म्हटल्यावर मंदिराच्या पुजाऱ्यांनी मंदिराचे दार उघडून आम्हाला आत जाण्यास परवानगी दिली त्यामुळे आम्हाला इतके सुंदर मंदिर पाहता आले.
(पारगडावरील भवानी मातेचे मंदिर )
या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवकालीन मूळ दगडी मंदिर आहे. या मंदिरातील भवानी मातेची मूर्ती नेपाळच्या गंडकी शिळेपासून तयार केली असून, ती प्रतापगडावरील भवानी मातेची आठवण करुन देते. भवानी मंदिरापलिकडे प्राचिन गणेश मंदिर आहे. गडाच्या तट फेरीस सुरवात केल्यावर आपणांस गुणजल, महादेव, फाटक गणेश तलाव लागतात. गडावर शिवकालीन १७ विहिरी आहेत, पैकी चांगल्या अवस्थेत आहेत बाकी बुजलेल्या अवस्थेत आहेत. तटाच्या पश्चिमोत्तर फेरफटक्यात आपणास भालेकर, फडणीस महादेव असे डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज अशी नावे असलेले आणखी बुरुजही गडास आहेत. गडाच्या उत्तरेकडील बाजूस दरीच्या काठावर महादेव मंदिर आहे. मुलांच्या खेळण्याच्या पटांगणा पलिकडे तुळसाबाई माळवे यांची १६८० मधील समाधी आहे, तर गडाखालील मिरवेल या गावात घोडदळ पथकाचे प्रमुख खंडोजी झेंडे यांच्या पत्नी म्हाळसाबाई यांचे स्मारक आहे.
पारगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे ११ वे वंशज बाळकृष्ण मालुसरे, शेलार मामांचे वंशज कोंडाजी शेलार, शिवकाळातील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे यांचे वंशज, कान्होबा माळवे इत्यादी वास्तव्यास आहेत. बाळकृष्ण मालुसरे व्यावसायानिमित्त अनगोळ, बेळगावला असतात. त्यांचेकडे तानाजींची तलवार शिवरायांच्या गळयातील सामुद्री कवड्यांची माळ जतन केलेली आहे. अशा फक्त माळा महाराष्ट्रात उपलब्ध असून, त्या सातारच्या राजवाडयात, प्रतापगडावरील भवानीच्या गळयात, कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत. माघी महिन्यातील उत्सवात दसऱ्याच्या उत्सवात गडावरील मावळे आपल्या पूर्वजांची शस्त्रास्त्रे प्रदर्शित करतात.
गडावर निवासाची व्यवस्था आहे.गडावर जेवणाची सोय नाही. पाण्याची सोय गडावरील तलावात विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.गड पाहाण्यासाठी अंदाजे ते तास लागतात. संपूर्ण गड फिरून झाल्यावर आम्ही छावणीठीकाणी आलो.चिवडा आणि फक्कड चहाचा आस्वाद घेऊन घराच्या एका प्रांगणात बुटातून पाय मोकळे करून गप्पा मारत बसलो. माझ्या फोनची बॅटरी रांगणावरच संपली होती. पारगडावर आमची सह्यांकन छावणी एका घरात असल्याने आणि वरती लाईटची सोय असल्याने फोन चार्जिंगची सोय झाली
ट्रेकभटकंतीमध्ये मी सहसा फोन विमानमोडवर ठेवते परंतु यावेळी फोन सतत वापरल्याने आणि ५ दिवसांचा ट्रेक असल्याने आपोआप बंद पडला होता. नंबर लावून दोनचार्जरवर आम्ही लेडीज गँगने थोडेथोडे का होईना फोन चार्ज. रात्री छावणीमध्ये उकडीची तांदुळाची भाकरी, चवदार पीठले, वरणभात, पापड असा छान बेत केलेला फस्त करून फ्रेश होऊन आराम करण्यास गेलो. नीलिमाने हाताने भाकरी थापून चुलीवर भाकरी बनवण्याचा आनंद घेतला. अजून एका मेम्बरने आईला दाखवण्यासाठी भाकरी भाजण्याचा व्हिडीओ बनवून घेतला. छावणीवर असे खूप छोटेछोटे किस्से गिरवून ते पुन्हा पुन्हा आठवत बसावेत आणि फोटोज आणि व्हिडीओज पाहत बसावेत. त्यासाठी सह्यांकन जरूर करावे. पारगडावरचा छान अनुभव पदरात घेऊन सकाळी लवकर उठून नास्ता चहा घेऊन तयार होऊन छावणी लीडर्स  मनीषा फडके, लांबा सर,महादेव वैशंपायन यांचे आणि जेवण बनवणाऱ्या अन्नपूर्णांचे आभार मानून आम्ही कलानिधीगडाकडे रवाना झालो. सह्यांकनचा तिसरा दिवस उत्तम नियोजनानुसार उत्तमच पार पडला. धन्यवाद लीडर्स. चक्रम हायकर्स रॉक्स.
(नंदकिशोर सरांनी पारगडावर सूर्यास्तावेळी घेतलेला फोटो )



4 comments:

  1. छान माहिती. काही सूचना.
    १. ज्या फोटोत कृष्णा गवस आहेत - ते दाखवत असलेली वाट, साळींदर करते. आपण तरस लिहिले आहे.

    २. ज्या फोटोत मनोहर-मनसंतोषगड दिसत आहेत - नारायणगडाच्या वाटेवर मनोहर-मनसंतोषगड दिसतात पण फोटोत दिसत आहेत ते मनोहर-मनसंतोषगड नसून आपल्या लेखात उल्लेख केलेले तीन सुळके आहेत.
    ३. माझं नाव राजन महाजन आहे. ते रंजन, रजन असे लिहिले आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सगळं केलं दुरुस्त. मी माझा स्वतःचा लेख पुन्हा वाचताना प्राण्याचे नाव आणि तुमचे नाव लिहिताना झालेली चूक लक्षात आली परंतु नेटच्या अनुपस्थितीमुळे दुरुस्त करायचे राहून गेले. होय साळींदरच म्हंटले होते कृष्णाने. नारायणगडाच्या वाटेवरून दिसणारे मनोहर-मनसंतोष गड आहेत हे गाईडच म्हणाला होता. जे दिसत आहेत ते तेच आहेत हे समजूनच फोटो जोडला गेला. धन्यवाद ..

      Delete
  2. खूप खूप सुंदर लेखन .. 👌🏼👌🏼 नारायणगड आणि पारगडाची इत्थंभूत माहिती.. पारगडाचा इतिहास... पार टोकाचा गड म्हणून पारगड नामकरण... त्यानंतर गडावरील मालुसरे... शेलार... माळवे हे वंशज व त्यांचेकडे अजूनही तानाजींची तलवार व शिवरायांच्या गळयातील सामुद्री कवड्यांची जतन केलेली माळ आहे ..
    अणि अशा फक्त ५ माळा महाराष्ट्रात उपलब्ध आहेत व त्या सातारच्या राजवाडयात... प्रतापगडावरील भवानीच्या गळयात... कोल्हापूर महालक्ष्मीच्या गळयात व तुळजापूरच्या भवानीच्या गळयात आहेत... ही माहिती केवळ न केवळ तुझ्या ब्लॉग मधूनच मला समजलं...🙏🏻🙏🏻 दोन्हीही अप्रतिम गड तू लिहिलेल्या ब्लॉग मधून सविस्तर समजले...😊😊 नेहमीप्रमाणेच सुंदर फोटोग्राफी 👌🏼👌🏼👌🏼 अणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेक मधला तुमचा जेवणाचा मेनू अप्रतिम असतो... 😊जयु तुझ्या ब्लॉग मधून गडाबद्दलची माहिती दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👏🏻 Keep it up dear 👍🏻🌹👍🏻

    ReplyDelete
  3. dear gitu thanx a lot. keep reading dear...

    ReplyDelete