Friday 10 January 2020

सह्यांकन समारोह- २०१९


सह्यांकन दिवस चौथा, ब्लॉग भाग- ५
सामानगड 
सामानगडाची उंची-३००४ फूट
किल्ल्याचा प्रकार - गिरिदुर्ग 
डोंगररांग - कोल्हापूर 
जिल्हा -कोल्हापूर 
 श्रेणी - मध्यम 
दिनांक २४ डिसेंबर २०१९ 

सामानगडावरील सह्यांकनची पहिली बॅच आणि लीडर्स 
नेसरीच्या प्रतापराव गुजर स्मारकातून सव्वातीनच्या सुमारास निघून एका तासात सामानगडावर पोहोचलो. चक्रम हायकर्सची सामानगडावरील छावणी तेथील प्रशस्त हनुमान मंदिरात होती. आमचे तिथे उत्साहात स्वागत झाले. सुरुवातीला नव्याने भेटलेले दोन-तीन दिवसानंतर जुने झालेले सगळे लीडर्स इथे सामानगड छावणीवर भेटले.
(छावणीवर पोहोचल्यावर ओळख परेड चालू असताना छावणीलीडर्स विंदा मॅडम, सुशील देसाई सर आणि सूर्यकांत सर  आणि मेंबर्स )
मंदिराचे आवार एकदम स्वच्छ होते. मुख्य दरवाज्यासमोरची दीपमाळ संध्याकाळच्या कोवळ्या उन्हात रेखीव दिसली. आम्हा पाहुण्यांचे स्वागत चहाने होऊन छावणी लीडर्स आणि पहिल्या बॅचच्या सर्व मेंबर्सची ओळख परेड झाली. सूर्य अस्ताला जाण्याआधी  सामानगडावर फिरण्यास निघालो. सूर्यकांत सरांनी प्रत्येक बुरुजाची आणि छोट्या छोट्या जागेची उत्तम प्रकारे माहिती दिली. मोठ्या चौकोनी विहिरीत प्रत्यक्ष आत पायऱ्या उतरून समजून सांगितले. 
गड भटकंतीला जाताना सूचना देताना सूर्यकांत सर 

समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या संवादादरम्यान एका दगडातून बेडूक निघाला अशी आख्यायिका आहे  त्या दगडाची जागा साधारण इथे असावी 


दर्शनी बुरुज
सामानगडावर जाण्यासाठी वरपर्यंत डांबरी रस्ता आहे. पर्यटकांनी सामानगड आवर्जून पाहण्याचे महत्वाचे कारण म्हणजे गडावरील वैशिष्टय़पूर्ण रचनेच्या जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी. अन्य कोणत्याही गडावर इतक्या संख्येने आढळणारी विहीर संकुले म्हणजे सामानगडाची खरीखुरी संपत्ती आहे.
 (खालील फोटोमध्ये अंधारकोठडीजवळील विहिरीचा फोटो आहे. जवळच कैद्यांना शिक्षा दिली जात असलेली अंधार कोठडी आहे तिथे अंधार असल्याने फोटो घेता आला नाही )
विहीर 


अंधार कोठडी 
विहिरीत उतरण्यासाठी खोदलेल्या कातळकोरीव पायऱ्या,पायऱ्यांच्या वरच्या बाजूच्या सुंदर कमानी, विहिरीतील भुयारे, पाण्याची कुंडे सारेच काही अप्रतिम आहे. किल्ल्यातील सोंडय़ा बुरुजासमोर मुघल टेकडी आहे. किल्ल्यावर तोफ डागण्यासाठी मोघलांनी ती निर्माण केल्याचे सांगतात.
मुघल टेकडी 


(आमचे पहिल्या बॅचचे लीडर्स आदित्य आणि अनिकेत)

गडभटकंतीबरोबरच हनुमान मंदिर, कातळ खोदून काढलेली लेणी, गडाच्या दक्षिणेकडील उतरणीवरील भीमशाप्पा नावाच्या सत्पुरुषाची समाधी वनभोजनासाठी स्वच्छ पाण्याचे कुंड, 'भीमसासगिरी' हा मंदिर समूह यांच्या भटकंतीमुळे सामानगडाची भटकंती छान होते. 
सामानगडचा थोडक्यात इतिहास-कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामान बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांचेकडे दिली. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या भागाची सबनिशी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामानगडाने इंग्रजाविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
शिवशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक वर्षं उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते, त्याच्या अगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. या किल्याचे असे एतिहासिक महत्त्व अधोरेखित झाले असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही .माजी आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नांतून किल्याचा थोडाबहुत विकास झाल्याचे आढळते. दुर्लक्षित असलेला पण निसर्गरम्य असा किल्ला पहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागते. पुणे-बेंगलोर महामार्गावरील संकेश्वर या गावावरूनही येथे जाता येते.
सामानगडावर जाताना बसमधून टिपलेला फोटो 
गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडीमार्गे गडाच्या पठारावर पायउतार झाल्यावर चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते. डाव्या बाजूच्या सडकेने गडावर प्रवेश करता येतो. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरूज बांधलेले आहेत.
(गडावरील भवानीमातेच्या मंदिरातील सजवलेली देवीची मूर्ती )
अंबाबाई मंदिराच्या पुढे गेल्यावर कमान बावडी लागते. या विहिरीतही उतरण्यासाठी पायऱ्या असून, पायऱ्यांवर सुंदर कमानी आहेत. पायऱ्या संपल्यावर भुयार लागते, त्यापुढे पाणी लागते. या ठिकाणी सात कमानी आहेत. यापुढे जाता येत नाही. या ठिकाणी पूर्वी कैद्यांना ठेवले जात होते. अशा आणखी विहिरी सामानगडावर आहेत. या वैशिष्यपूर्ण विहिरी हे सामानगडाचे भूषण आहे
(जांभ्या दगडातील कमानी असलेल्या विहिरी )
(जांभ्या दगडातील कमानी असलेल्या विहिरी )
पुढे एक चोर दरवाजा लागतो. येथून पूर्व दिशेला गडाचा आकार निमुळता होतो शेवटी चिलखती सोंड्या बुरुज लागतो. सोंड्या बुरुजासमोर मुगल टेकडी दिसते. ती मुगल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकांत आहे.

साखर विहिर 
चोरखिंडीकडे जाताना एक विहीर आहे तिला साखर विहीर म्हणतात. अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात. चोर दरवाज्यामध्ये आम्ही सर्वांनी प्रत्यक्ष जाऊन दुसऱ्या बाजून निघून दरवाज्याची पाहणी करून  पुन्हा या बाजूने आलो. प्रत्येक वास्तूची  बांधणी सुव्यवस्थित अशी आढळते. 
जे जे शक्य ते ते पाहून झाल्यावर अंधार पडत आल्याने छावणीकडे रवाना होऊन तोंडावर पाणी मारून ताजे होऊन चहाचा आस्वाद घेतला. पहिल्या बॅचचा सह्यांकनचा शेवटचा दिवस असल्याने चक्रम हायकर्सचे संस्थापक मेंबर किरण देशमुख हजर होते.सिनिअर मेंबर महेश केंदूरकर आणि पराग ओक हे देखील उपस्थित होते. शमांगी देशपांडे हजर होत्या.  पाच दिवसांच्या आम्हा मेंबर्सचा ट्रेकचा अनुभव आणि एकंदरीत आढावा घेऊन प्रत्येक मेंबरला लीडर्सच्या हस्ते सह्यांकनचे सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. त्यादिवशी दुबे सरांच्या वाढदिवसाच्या केकचे देखील आयोजन केले गेले.

सह्यांकनचे प्रमाणपत्र देताना लीडर्स 
सह्यांकन मध्ये एकूण एकाची व्यक्तिशः काळजी घेतली जाते. प्रत्येकाकडे जातीने लक्ष दिले जाते ही गोष्ट मला फार आवडली. समारोपाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्रीच्या जेवणाची मेजवानी तेवढी बाकी होती. रात्रीच्या जेवणात गरमागरम पुरी, छोले, व्हेज पुलाव, पापड, सलाड, आणि गुलाबजामून असा झकास मेनू होता. सर्व लीडर्स अगदी अगत्याने प्रेमाने जेवण वाढत होते.
जेवण वाढताना लीडर्स 
आम्हा माहेरवाशिणींचा शेवटचा दिवस असल्याने आम्हाला दुसऱ्या दिवशी असे आयते जेवण मिळणार नव्हते याचे मनोमन वाईट वाटत होते आणि घरी जाण्याचा आनंददेखील होता. पंचपक्वान्नांचा आस्वाद घेऊन त्या गुलाबी थंडीत अंताक्षरी नाही झाली तर मग काय केलं आम्ही. रात्री साडेअकरा पर्यंत वेगवेगळ्या हिंदी मराठी ट्रेकची गाणी आणि इतर भन्नाट गाण्यांची महफिल रंगल्यावर सर्वजण मंदिराच्या प्रांगणात आपापल्या बॅग पॅक करून स्वतः सुखाने झोपून दुसऱ्याला घोरून त्रास देऊन गुडूप झाले.

छावणी  ज्या ठिकाणी होती त्या मंदिरातील हनुमानाची मूर्ती 


सकाळी पहाटे ५ला उठून रोजचा बेड टी झाल्यावर भराभर आवरून रोजचा सकाळचा व्यायाम करून सामानगडावरील राहिलेली ठिकाणे पाहावयास निघालो. रामायणकालीन भूयारी शिवमंदिराला भेट दिली तेथील सामानगडावर वास्तव्यास असलेले आणि अध्यात्माची प्रचंड आस असणारे गोखले सर रात्रीपासूनच आमच्याजवळ अध्यात्माचे व्याख्यान देऊन गेले होते आणि आमची सकाळीदेखील वाट पाहत होते. आम्ही गेल्यावर त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
भुयारी शिवमंदिर 

६४लिंगी शिवलिंग 
६४ शिवलिंगे एकत्र असलेली पिंडी तिथे पाहावयास मिळाली. प्रत्येक कोनाड्यात पिंडीची स्थापना केली होती. त्यामुळे महालिंगेश्वर मंदिर नाव पडले असावे. मंदिरात अनेक समाधीस्थळेदेखील आढळली. आतमध्ये हनुमानाचे मंदिर शनी मंदिरदेखील होते.  मंदिराचा परिसर अगदी स्वच्छ होता.
सूर्योदय 
सूर्यदेव उगवला होता ते मनोहारी दृश्य प्रत्यक्ष पाहण्यातच सुख आहे. सूर्याचे तेजस्वी रूप मोहक होते. तिथे जवळच प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना वास्तव्य केलेल्या लेण्या आहेत. त्यात विविध देव देवतांची मंदिरे आहेत.या ठिकाणी प्रभू रामचंद्र वास्तव्यास होते असे स्थानिक म्हणतात. सूर्याच्या सकाळच्या किरणांतून मिळणारी ऊर्जा येथे एका शिळेजवळ ध्यान लावून बसून अनुभवावी अशी आख्यायिका आहे.

प्रभू रामचंद्र वनवासात असताना ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या ह्या गुहा आहेत असे स्थानिक म्हणतात. 
त्याठिकाणाहून आम्ही पायऱ्या उतरून भीमाशप्पा सत्पुरुषाची समाधी पाहावयास निघालो. २किमी गेलो तरी ते समाधीस्थळ सापडेना. त्यानंतर आम्ही छावणीवर परत आलो. मात्र खडा चढ चढून छान वॉर्मअप झाला.
सकाळचा भन्नाट नास्ता वडा पाव आणि झणझणीत चटणी 
छावणीवर आल्यावर गरमगरम बटाटावडा आणि चटणीवर ताव मारून चहाचा आस्वाद देऊन बॅनर फोटो ग्रुप फोटो घेऊन पाचदिवसांच्या सामानाची सॅक पुन्हा पाठीवर घेतली. सामानगड छावणीचे मुख्य लीडर सुशील देसाई सर,सूर्यकांत सर, विंदा मॅडम यांचे खूप-खूप आभार मानून जड अंतःकरणाने परतीच्या वाटेला निघालो तरीही लास्ट सेल्फी करीत-करीत पुन्हा-पुन्हा हजारो सेल्फ्या घेत बसलो.

निघताना छावणी लीडर सूर्यकांत सर आणि बॅच लीडर आदित्य यांच्यासोबत सेल्फी 
ना आमची पावले छावणीतून निघत होती ना लीडर्सची पावले आम्हाला सोडून छावणीकडे जात होती. तिथून निघताना डोळ्यात आलेले पाणी कोणाला दाखवले नाही परंतु लेख लिहिताना खरंच  रडू आवरेना झाले.
चक्रम हायकर्सचे लीडर्स, लाईफ मेंबर्स  यांच्यासोबत एक फोटो तो बनता है बॉस 
इतके ट्रेक करतो आम्ही परंतु माहित असते पुन्हा दुसऱ्या महिन्यात ट्रेकला जाणार आहोत. परंतु सह्यांकन दोन वर्षातून एकदाच असते त्यामुळे पुन्हा येणे होईल होईल या आठवणीने खरंच सासरी जाताना जसे वाटते अगदी तशीच भावना त्या दिवशी होती. आमच्या पहिल्या बॅचचे लीडर्स आदित्य आणि अनिकेत तुमचे विशेष कौतुक करतो आम्ही. आमची मस्तीखोर बॅच असूनदेखील तुम्ही आम्हाला उत्तमरीत्या झेललेत शिवाय सह्यांकनच्या बॅचची पहिलीच लीडरशिप असूनसुद्धा ती जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडलीत. आमची अगदी घरच्या व्यक्तिसारखी काळजी घेतलीत. मनापासून खूप खूप कौतुक. 
तुमच्या आयुष्यात अशी अनेक सह्यांकने उत्साहात जोशात सुखरूपपणे अतिशय शिस्तबद्द नियोजनबद्धरीत्या पाड पडोत.  चक्रम हायकर्सशी तुमचे नाते असेच घट्ट राहो.
वाट पहात असलेली आमची बसराणी 
आमची बस  मंदिराच्या गेटबाहेर जणू आमची  वाट पहात  उभी होती. 
महामंडळाचे बस चालक श्री उबाळे यांनी प्रवासात उत्तम साथ दिली. मुंबई कोल्हापूर मुंबई प्रवास खूपच सोपा केलातसर्वांना टाटा करून नऊच्या सुमारास आमची बस मुंबईच्या दिशेने निघाली. आमच्यातील लीडर आदित्य यांना सामानगड छावणीवर रहावे लागले.त्यामुळे एकटे अनिकेत आमच्या सोबत बसमध्ये होते.
उसाच्या रसाच्या प्रतीक्षेत असणारे आमचे मेंबर्स 
एका ठिकाणी मनसोक्त उसाचा रस, एका ठिकाणी भरपेट उत्तम जेवणाचा आस्वाद घेऊन केदार दिघे यांनी मागता दिलेल्या आईस्क्रीमचा स्वाद काही आगळाच होता.
दिघे सरांनी खाऊ घातलेले आयस्क्रीम 
आम्ही काही मेंबर्सने बसमध्ये तीन-चार तास अंताक्षरीचा मनमुराद आनंद घेतला. सोनेवाले सोते गये गानेवाले गाते गये. जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना?. सह्यांकनच्या पहिल्या बॅचचे मेंबर्स- ब्रिजेश, पंकज, नंदिता, मनीष, केदार, गुरुदत्त, हर्षद, अथर्व, पूर्वेश, अनिकेत, सुजाता, सायली, विद्या, कौस्तुभ, अमिता,नंदकिशोर, वीणा, अजय, नीलिमा, प्रकाश, विक्रम . सर्व मेम्बर्सचा उत्साह, सहभाग, उत्तम होता. लहान मेंबर गुरु आणि अथर्वने  थकता सगळे ट्रेक हसत हसत माहिती घेत पूर्ण केलेत.डीएसएलआर
उत्तम फोटोग्राफी करून लवकरात लवकर ग्रुपवर अपलोड करणारे नंदकिशोर सर 
फोटोग्राफर नंदकिशोर सर, अनिकेत सगळे फोटोज तूम्ही दिलेत तर तुम्हाला खूप धन्यवाद. हाहाहा बँगलोरहून विमानाने आलेला ब्रिजेश, जाताना बडोदराला गेला. हा बापुडा कुठून कुठे सह्यांकनसाठी आला सलाम तुला.  अनिकेत, आदित्य, सूर्यकांतसर लीडरशिपमध्ये बिझी असूनदेखील चांगले फोटो काढता आले तुम्हाला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे बंधुराज परममित्र तुषार कोठावदे प्रशांत कोठावदे यांच्यामुळेच आम्हाला चक्रम हायकर्सच्या ह्या सह्यांकन नावाच्या जादुई इव्हेंटमध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभले. हे तुषार भावा, वनिता आणि मी मनापासून तुझे खूप-खूप ऋणी आहोत. जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे पाच दिवस आम्हाला जादूच्या दुनियेची सफर करविलीस एकूणच काय तर २०१९ चे १९ वे सह्यांकन तुफानी होते. चक्रम हायकर्स रॉक्स.
लीडर्ससोबत ग्रुप फोटो 
(संदर्भग्रंथ-डोंगरयात्रा - आनंद पाळंदे,दुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर,किल्ले - गो. नी. दांडेकर,इतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर,महाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर , आणि गुगल साभार.)









5 comments:

  1. जयू सह्यांकन हा अनुभव असतो आणि तो घेतल्यानंतर नेहमी ट्रेक करणाऱ्याचीही ट्रेककडे बघण्याची नजर बदलते.चक्रम हा सह्याद्रीतील सर्वात चांगल्या मनाच्या माणसांचा समुह आहे आणि यानिमित्ताने तू आणि वनिता यात सहभागी झाल्या याबद्दल संपूर्ण चक्रम परिवाराच्या वतीने तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन!💐💐

    ReplyDelete
  2. धन्यवाद तुषार ...😊

    ReplyDelete
  3. समारोह.... हा शब्द ऐकायला अणि वाचायला एकूणच जड जातो... 😊 चक्रम परिवार सोबत चौथ्या दिवशी सुद्धा तू बराच मोठा अनुभव घेतला... समानगडावरील जांभ्या दगडात कुशलतेने खोदून काढलेल्या विहिरी खूपच अद्भुत 👍🏻🌹👍🏻 आधी कधीच न पाहिलेले ६४ लिंगी शिवलिंग तर खूपच अद्भुत 🙏🏻🌺🙏🏻🌺🙏🏻 तुझा ब्लॉग वाचताना तुझ्या सोबत गडावर फिरत असल्याचा भास झाल्या शिवाय राहत नाही... एवढा छान अभ्यास असतो तुझ्या ट्रेक अणि ट्रेक मधील पूर्ण शिवकालीन वास्तूचां... 👌🏼🌹👌🏼🌹👌🏼 I m really very proud of you dear 👏🏻👏🏻👏🏻 खूप Great आहेस तू... 😊😊 Keep rocking 👍🏻

    ReplyDelete
  4. Thanx A lot Dear Gituuu �� wel milel tevha wachtes Maza blog ..agadi aawdine wachtes...khup Chan reply asto tuza .. Tu khara Blog lover aahes ��keep reading ��

    ReplyDelete
  5. All 5 Sahyankan Parts are amazing ..& Team Chakram hikers also :)

    ReplyDelete