Friday 10 January 2020

सह्यांकन,कलानिधीगड ब्लॉग भाग ४

सह्यांकन दिवस ४था 
कलानिधीगड ऊंची- ३३२९ फूट                  
किल्ल्याचा प्रकार - गिरीदुर्ग                     
डोंगररांग- कोल्हापूर                                  
जिल्हा- कोल्हापूर                                    
चढाई श्रेणी- मध्यम                                 
दिनांक २४ डिसेंबर २०१९ 
कलानिधीगडाचा थोडक्यात इतिहास- सभासद बखर, चित्रगुप्तांची बखर, चिटणिसांची बखर, शिवदिग्विजय, शिवप्रताप, एक्याण्णव कलमी ऊर्फ रायरीची बखर, शेडगावकर बखर, एकशे नऊ कलमी बखर इत्यादी बखरींचा शिवचरित्राच्या अभ्यासासाठी उपयोग केला जातोपरंतु या सर्व बखरींमध्येसभासदाची बखरसर्वांत जुनी आणि अधिक महत्त्वाची मानली जाते. बखरकारांपैकी कृष्णाजी अनंत सभासद हाच बखरकार शिवछत्रपतींचा समकालीन होता. त्याने शिवछत्रपतींच्या जीवनातील काही घटना प्रत्यक्ष पाहिल्या होत्या. त्यामुळे अर्थातचसभासद बखरही इतर कोणत्याही बखरीपेक्षा अधिक विश्वसनीय मानली जाते.
कृष्णाजी अनंत सभासदांचे वंशज कोल्हापुरी दरबारात चिटणीसाकडील काम पाहत असावेत, असा इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा तर्क आहे. खुद्द कृष्णाजी अनंत सभासद हे शिवाजी महाराजांपासून ते राजाराम महाराजांच्या अखेरीपर्यंत सभासद (सल्लागार) म्हणून काम पाहत होते.
सभासदाने या बखरीत शिवजन्म, शिवाजी महाराजांची बंगलोर भेट, जुन्नर शहर लूट, राजगड बांधणी, चंद्रराव मोरे प्रकरण, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, मिर्झाराजे यांची भेट, शिवछत्रपतींची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका, सिद्दी जोहरचा वेढा, तानाजी सिंहगड घेतो, शहाजी महाराजांचा मृत्यू, राज्याभिषेक, दक्षिण विजय, शिवाजी-संभाजी मतभेद, शिवछत्रपतींचा मृत्यू यासारखे प्रसंग मोजक्या आणि नेमक्या शब्दांत लिहिलेले आहेत.सभासद बखरीतील उल्लेखानुसार हा किल्ला शिवरायांनी वसविलेल्या १११ किल्ल्याच्या यादीत आहे. हेरेकर सावंत भोसले, तांबूळवाडीकर सावंत यांचा कलानिधीगड किल्ल्याशी प्रामुख्याने संबंध आला. गडाच्या दक्षिण बाजूकडील तटबंदीच्या मजबुतीकरणा संबंधात करवीरकर छत्रपतींच्या कागदपत्रात या गडाचा उल्लेख आलेला आहे. पोर्तुगिज दप्तरातही कलानिधीगडाचा वारंवार उल्लेख येतो.
वाचलेली खास उल्लेखनिय गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु..देशपांडे यांचे मूळ आडनाव कलानिधीगडकर असे होते. त्यांचे पूर्वज या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांचे मूळ गावही चंदगड तालुक्यातील जंगमहट्टी हे होते. या गावावरुनही त्यांना जंगमहट्टीकर या नावाने ओळखले जाई, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु.. देशपांडे यांना कलानिधीगडकर या नावाने हाक मारीत असत.
दिनांक २४डिसेंबर २०१९ रोजी सकाळी चहा नास्ता करून छावणीकरांचा निरोप घेऊन पारगडावरील छावणीवरून दुपारच्याजेवणासाठी वांगेबटाटा भाजी आणि चपाती डब्यामध्ये बांधून घेऊन कलानिधीगडाकडे रवाना झालो. जाताना घनदाट जंगलातून आमची ऐसपैस बस ऐटीत राणीसारखी निघाली होती. छोटे डांबरी रस्ते, काही ठिकाणी कच्चे रस्ते मोहवीत होते. हिरवेगार जंगल आणि वळ्णावळणाला येणारी कोवळी सूर्यकिरणे पाहून बसमधून खाली उतरून चालत निघावेसे वाटत होते.
साडेनऊच्या सुमारास कालिवडे गावात पोहोचून लीडर्सने बस लावण्यासाठी जागा शोधली आणि लगेच ट्रेक सूर केला. केव्हाही पाहिलेल्या गोष्टीचे आपल्याला नवलच असते. कालनिधीगड दुरूनच सुंदर दिसत होता. गडावर जाण्यासाठी मोठा रस्ता बनवण्याचे काम सुरु आहे असे दिसले. जंगलाचा मोठाच्या मोठा भाग खोदलेला पोखरलेला दिसला. किल्ल्यावर जाण्यासाठी चार चाकी वाहन, ट्रॅक्टर, जाईल असा हाच कच्चा दगडी रस्ता सुद्धा काढला आहे. हा गडाला लांबची फेरी मारून वरती येतो.
आम्ही ह्या दगडी रस्त्याने जाता पायवाट पकडली आणि गड चढायला सुरुवात केली.
अर्ध्या तासावर असलेले एक मंदीर पार करून पुढे जात राहिलो आजूबाजूला दोन-तीन पाण्याचे बंधारे आणि एक प्रशस्त असे जंगमहट्टी धरण जणू थंडी असल्याने अजून कोवळे ऊन खात पहुडले होते. गडावर फडकणारा भगवा त्याच्या फडकण्यातून हात करून हॅलो करीत असताना भासला. सह्याद्री हा असाच आकर्षूण घेणारा आणि सर्वांना सामावून घेणारा आहेरमतगमत ११च्या सुमारास गडावर पोहोचलो
कलानिधीगडाचे प्रवेशद्वार लहान असले तरी फारच देखणे आहे. चांगल्या अवस्थेत असणारा हा दरवाजा गडाचा दुसरा दरवाजा आहे. कारण किल्ला फिरताना आम्हाला भग्न झालेला गडाचा मुख्य दरवाजा दुसऱ्या बाजूला दिसला. दरवाजातून आत गेल्यावर आपणास गड दोन भागात विभागल्याचे दिसते. एका भागात दूरसंचार खात्याचा मनोरा आहे तर दुसऱ्या भागात गडाचे अवशेष आहेत. दरवाज्यासमोर डाव्या हातास आपणास अनेक जुनी बांधकामे दिसतात. गडावर दरवाज्याजवळच तोफा आहेत. 
मुख्य दरवाज्यातून उजवीकडे आम्ही गडाच्या पश्चिम तटबंदीवर चढून पुढे जाऊन पहिले येथील उतारावरचे जंगल अतिशय घनदाट आहे. आजूबाजूचा नजारा खूपच सुंदर दिसतो. चारी बाजूने जलाशये नजरेस पडतात. या ठिकाणी एक भव्य बुरुज लागतो. यापुढील तटाचा काही भाग पाडून दूरसंचार खात्याने वर येण्यासाठी सडक बनविलेली दिसते. ही गोष्ट वगळता संपूर्ण गडाची तटबंदी चांगल्या अवस्थेत आहे. या सडकेने खाली उतरुन गडाकडे पाहिल्यास गडाच्या तटबंदीचे बुरुजांचे फारच विलोभनीय दृष्य दिसते.रुबाबदार व्यक्ती दिमाखाने स्वागताला उभी आहे असा भास होतो

पुढे गेल्यावर तटबंदीच्या आत एक पायऱ्या असलेली मोठी खोली दिसते ती विहीर होती. येथील विहीर म्हणजे दगडाची प्रचंड मोठी खाण आहे. येथील आयताकृती विहिरीची लांबी अंदाजे चोवीस मीटर, रुंदी अठरा मीटर आणि सरासरी खोली पाच-सहा मीटर आहे. किल्ल्याच्या बांधकामातील दगड ह्याच खाणीतून काढले जायचे वापरलेल्या दगडाचे काम झाल्यावर अश्या खाणींचा उपयोग नंतर विहिरी म्हणून केला गेला. सामानगडसारख्या किल्ल्यांवर ह्या खाणींना पाणी लागले आणि त्या ठिकाणी एकच मोठीच्या मोठी विहीर तयार झाली असे पहिले.
 
कलानिधीगड या किल्ल्यांवर खाणीमध्ये पाणी लागलेले दिसत नाही. त्यामुळे खाणीच्या तळाशी अजून खोल खणून विहिरी काढण्यात आल्या. कलानिधीगडावर ह्या खाणीत तीन कोपऱ्यात तीन विहिरी खणल्या आहेत. ह्यातील एकच विहीर सध्या वापरात आहे. बाकी दोन बुजलेल्या स्थितीमध्ये आहेत. वापरात असलेली विहीर अंदाजे साठ फूट खोल va ह्यातील पाण्याची पातळी अंदाजे पन्नास फुटांवर असावी. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची ही एकमेव सोय आहे, त्यामुळे किल्ल्यावर येताना सोबत लांब दोर असलेला चांगला. या विहिरीच्या संकुलात अनेक पायऱ्या, देवळया चौथरे, भुयार, चोरवाट इत्यादी आढळतात. महाराजांच्या दूरदृष्टीला सलाम. कोणतेही गडकिल्ले बांधण्याआधी तिथे पाण्याची सोय करावी त्यासाठी त्याकाळी गडांचे बांधकाम तसे केले गेले त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा किल्ल्यांवर पाण्याची अनेक टाकी बघायला मिळतात.युद्धामध्ये जिथे पाण्याची जागा आहे तिथे विष टाकून ते निरुपयोगी करणे ही सुद्धा एक नीती होती. त्यामुळे अश्या वेळेस गडावर अनेक टाकी, तेही किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात असणे केव्हाही सोयीचेच होते.
विहिर संकुल पाहून गडाची तटबंदी पाहून फडकणाऱ्या भगव्याकडे ग्रुप फोटो घेण्यास वळलो. साध्या साडीवरसुद्धा सुहासिनींच्या केसात गजरा जसा शोभून दिसतो तसाच गडावर फडकणारा भगवा गडाची शोभा आणि शान वाढवतो. गडाचा विस्तार लहान असून इतक्या कमी जागेत किल्ल्यावर आवश्यक अश्या सर्व प्रकारच्या इमारती उभारल्या आहेत. कलानिधीगड ज्या डोंगरावर वसला आहे, त्याची रचना वैशिष्टयपूर्ण आहे. गड आटोपशीर असून उत्तम तटबंदीने वेढलेला आहे. गडावर रहाण्याची सोय नाही.जेवणाची सोय आपण स्वत: करावी.गडावरील विहिरीत पिण्यायोग्य पाणी आहे.कलानिधीगडावर पोहोचण्यास कालिवडे गावातून ते दीड तास लागतो.
महिपालगड आणि कलानिधीगड एकाच मार्गावर असल्याने ते एकाच वेळी करू शकतो तसेच स्वतःची गाडी असल्यास दोन्ही गड एका दिवसात पाहून होतात.गड किल्ल्यांना परमोच्च महत्व प्राप्त झालं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातच. गड किल्ल्यांचा आधार घेऊन आपलं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. महाराजांनी योग्य जागा हेरल्या. मोक्याच्या जागेच्या आजूबाजूच्या डोंगरावर बुरूज-तटबंदीचा साज चढवून किल्ल्यांची उभारणी केली.
बहुतांश किल्ल्यांवर फक्त दरवाजे, तटबंदी आणि बांधकामाच्या ज्योती शिल्लक राहिल्या आहेत.परंतु काही गडांवर शौचकूप बांधलेली होती ती या गडावर ती पहावयास मिळतात. पूर्वीच्या काळी तटावर चोवीस तास पहारेकरी असायचे ह्या पहारेकऱ्यांसाठी केलेली ही सोय होती जेणेकरून त्यांना नित्यविधींसाठी तटापासून लांब जायची गरज भासू नये. 'शौचकूप' हे एक बांधकाम असं आहे की जे अजूनही आपल्या दैनंदिन जीवनाशी जास्त निगडित आहे शिवाय त्याच्या रचनेत फारसा बदल झालेला दिसत नाही. अशी अजून तीन शौचकूप ठराविक अंतरावर आहेत. येथे गडफेरी पूर्ण झाली.

(गडावरील घरांचे, वाड्यांचे अवशेष )

संपूर्ण किल्ला त्या काळी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य अशा गडकिल्ल्यांची उभारणी करण्यात आली. प्रत्येक किल्ल्यावरील बांधकामाला एक वेगळा अर्थ आहे. हे बांधकाम घडविणारा कारागीर वेगळा आहे, त्यामुळे त्यात विविधता आहे. ह्या बांधकामातच आपल्या इतिहासाची आणि समाजरचनेची पायामुळं आहेत.किल्ल्यांना नुसत्या भेटी देऊन परतण्यापेक्षा,वेळ देऊन जर ते समजून घेतले तर स्वराज्याचा इतिहास अजून चांगल्या प्रकारे लक्षात राहील शिवाय त्या वास्तूबद्दल, आपल्या पूर्वजांबद्दल मनात आदरभाव निर्माण होऊन समाधानाने घरी परतू.
(खालील फोटोमध्ये गडावर लहान मुलांची सहल घेऊन आलेली शिक्षिका- शिक्षक आणि शाळेची मुले आहेत शिक्षिका- शिक्षकखरंच ग्रेट आहेत. आजच्या मुलांना गडांची माहिती देणे आणि इतिहास समजावून सांगणे गरजेचे आहे.)
गडाची फेरी पूर्ण करून तिथे जास्त वेळ घालवता लगेच गड उतरलो एका छोट्या मंदिरात दुपारचे जेवण करून एक तासाचा प्रवास करून प्रतापराव गुर्जर स्मारकाजवळ आलो. कलानिधीगडावरून सामानगडाकडे जाताना कोणाकोणाच्या फोनला रेंज येत होती त्या व्यक्ती पाच दिवसाचा गप्पांचा वचपा काढून समोरच्याला पार घे शपथ घे शपथ करून हळूच हैराण करीत होती परंतु आमच्या तीक्ष्ण कानाने ऐकले ते ऐकले. हाहाहा कलानिधीगडाकडून निघताना त्या जंगलात कोल्हा, धनेश आणि मोराने दर्शन दिले. न दिसणाऱ्या वन्य प्राण्यांनी दर्शन दिल्याने धन्य झालो आम्ही. 
(बसमधून उतरतानाच हा प्रतापराव गुजर स्मारकाचा परिसर प्रसन्न वाटत होता.)
स्मारकाचा थोडक्यात इतिहास : कोल्हापूर जिल्ह्यातील एक स्फुर्तीदायक स्मारक म्हणजे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे स्मारक होयगडहिंग्लजच्या सुप्रसिध्द सामानगडापासून सुमारे २०कि.मी. अंतरावर महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाच्या परंपरेचे मानकरी, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या बलिदानाने पवित्र झालेले धारातीर्थ आणि त्या पावन भूमीवर प्रतापराव गुजर यांच्या शौर्याची साक्ष देणारे स्मारक उभे आहे. नेसरी, दि. २४ फेब्रुवारी १६७४.सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा शिलेदार(विसोजी बल्लाळ, विठोजी शिंदे, विठ्ठल पिलदेव अत्रे, दीपाजी राऊतराव, सिद्दी हिलाल, कृष्णाजी भास्कर) ह्यांच्या स्वामिनिष्ठेचा,पराक्रमाचा इतिहास हा गहिवरून आणणारा आहे. राज्याभिषेकाच्या सुमारास आदिलशाही सरदार बेहालोल खान स्वराज्यामध्ये धुडगूस घालत होता. महाराजांनी सेनापती प्रतापराव गुजर ह्यांस खानावर धाडले. प्रताप रावांनी खानाला नेसरीच्या मैदानात चारी मुंड्या चित केले. खान शरण आला आणि तह केला. प्रताप रावांनी खानाला क्षमा करून सोडून दिले. परंतु खान पुन्हा मराठी मुलुखात धुडगूस घालू लागला. तेव्हा महाराजांनी सेनापतीस खरमरीत पत्र लिहिले."स्वराज्यावर चालून येणाऱ्या गनिमास गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका." प्रतापराव संधी शोधत होते परंतु बेहालोल खान आता २० हजार सुसज्ज फौजेसह होता. परिस्थिती अत्यंत बिकट होती कारण रायगडावर राज्याभिषेकासाठी तर सरसेनापतीस जावेच लागणार! परंतु राजांनी तर "तोंड दाखवू नका" असा इशारा दिला होता. सरनौबत कात्रीत सापडले होते.हेच ते कुड्तोजी गुजर ज्यांनी मिर्झा राजे जयसिंगाच्या छावणीत जाऊन त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला केला होता परंतु मुत्सद्दी जयसिंगाने त्यांना सोडून दिले होते. महाराजांनी त्यांना प्रतापराव हा किताब देऊन सेनापतीपद दिलेअखेर खान पुन्हा एकदा समोर आला. परंतु त्यावेळी  प्रतापरावाकडे अवघे १२०० सैन्य होते तर खानाचा सैन्यासागर १५०००  प्रताप रावांनी आपल्या फौजेला खानाच्या तोंडी देता सरळ एकट्याने खानाच्या फौजेवर चालून गेले. अगदी अचानक हल्ला.क्षणमात्र विचार करता त्यांचे सहा शिलेदार देखील पाठोपाठ आपल्या सेनापतीसह दौडू लागले...सातही जण जाऊन खानाच्या फौजेला भिडले, एकच वीज तळपली आणि क्षणार्धात काळाकुट्ट अंधारकाय ती स्वामीनिष्ठा आणि काय तो पराक्रम! शिवरायांना आपल्या पत्रातील मजकूर प्रतापराव इतका मनाला लाऊन घेतील असे वाटले नव्हते. परंतु प्रतापरावासारखे अस्सल स्वामीनिष्ठ सेवक असेच अनोखे पराक्रम घडवून आणतात. समोर पसरलेल्या गनिमी सैन्य सागरावर आपल्या सेनापती पाठी चालून जाणारे त्यांचे सहा शिलेदार म्हणजे तर स्वमिनिष्ठेचा कळस. प्रतापराव तर सुडाने पेटून उठले होते, विवेकावर वीरश्री स्वार झाली होती. मात्र हे सहा शिलेदार निव्वळ स्वामी निष्ठेने पेटून उठले होते. "धन्य ते शिवराय,धन्य ते सरनौबत,धन्य ते शिलेदार,धन्य ती स्वामीनिष्ठा,आणि धन्य धन्य ते स्वराज्य. धन्य ते शिवाजी महाराज, स्वराज्याची संकल्पना आणि त्यासाठी जीवाची बाजी लावणारे मावळे."
आतमध्ये डाव्या बाजूस शिवाजी महाराजांचा १८/२० फुट उंच सिंहासनारूढ पुतळा आहे. शिवमंदिरदेखील आहे. 
जवळच एक मोठा स्तंभ उभारला आहे. त्यावर त्या युद्धाची माहिती लिहून ठेवली आहे. स्तंभासमोर शुरतेचे प्रतिक म्हणून एक ढाल आणि तलवार आहे. ती माहिती वाचुन झाल्यावर स्मारकात समाधीस्थळी क्षणभर विश्रांती घेतली त्यावेळी सारा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. समाधीला  वंदन करून, महाराजांना, प्रतापरावांना आणि त्या सहा वीरांना मुजरा करून, आम्ही सामानगडाकडे रवाना झालो.                       
वेडात मराठे वीर दौडले सात धृ.
श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात
वेडात मराठे वीर दौडले सात
ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!
वेडात मराठे वीर दौडले सात
वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात
जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत
वेडात मराठे वीर दौडले सात
ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात
आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात
खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात
दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात
कुसुमाग्रज.
कुसुमाग्रजांच्या या कवितेचा प्रत्यय घेत प्रत्येक ट्रेकरने, प्रत्येक मराठी माणसाने, शिवप्रेमींनी आवर्जून पहावे असे हे स्मारक आहे. रांगणा गडावर आपटे सरांना प्रतापराव गुजरांची शूरता सांगताना गहिवरून आलेला प्रसंग आठवला आणि मला देखील गहिवरून आले.  
(७ वीरांच्या शुरतेचे प्रतिक म्हणून उभारलेले शिल्प - ढाली आणि तलवारी.)
सह्यांकनचा समारोह लेख भाग -५ मध्ये वाचावयास मिळेल 

2 comments:

  1. अतिशय सुंदर लिखाण✍️ कलानिधी गडाबद्दलची छान माहिती मिळाली.... एक वाक्य तंतोतंत पटलं... कोणत्याही भव्य दिव्य गडाला शोभा येते ती त्यावर फडकत असणार्‍या भगव्या मुळेच ������������ प्रतापराव गुजर यांच्या बद्दल मला तुझ्या ब्लॉग मधूनच समजलं.... त्यांनी दाखवलेला पराक्रम अणि स्वामीनिष्ठा यांना शतशः प्रणाम ������������ जयु...तुझे खुप खुप धन्यवाद ���� अणि तू खरंच खूप नशीबवान आहेस की तू हे गड किल्ले पाहतेस... जगतेस... अणि ते सुंदर शब्दांतून व्यक्त करतेस...!!!
    ब्लॉग वाचताना "वेडात वीर दौडले सात"... ह्या कवितेचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही... सात विरांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सात ढाली अणि सात तलवारीचें शिल्प पाहून खूप खूप धन्य वाटले.... ������������ अप्रतिम ब्लॉग... ��

    ReplyDelete
  2. Thanx Dear Gituuu....��keep reading bhagwa fadkatanacha prasang Maza aawdta prasang asto ..

    ReplyDelete