Thursday 10 December 2020

"ढाकोबा ट्रेक"


ढाकोबा ट्रेक(दाऱ्या घाट)

ठिकाण- जुन्नर, पुणे

दिनांक- डिसेंबर २०२०

उंची - सुमारे ४१०० फूट 

किल्ल्याचा प्रकार -गिरीदुर्ग 

डोंगररांग- (दुर्ग ढाकोबा)

चढाई श्रेणी मध्यम

माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे   यांचा १०६वा धाकोबा ट्रेक रविवार दिनांक डिसेंबर २०२० आयोजित केला होता. लॉकडाऊनच्या दहा महिन्यानंतर ग्रुपचा हा पहिला ट्रेक असल्याने कोविडची दहशत अजून आहेच परंतु किती दिवस आपण असे कमी प्राणवायू घेत आणि कोविडचे टेंशन घेऊन घरात बसणार??आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर रोजचे चालणे या व्यायामासोबत ट्रेकिंगसारखा दुसरा व्यायाम नाही.  कोविड संदर्भात सर्वप्रकारची काळजी घेऊन कमीत कमी ट्रेकर्सना घेऊन आमची बस निगडी-चिंचवड-डांगेचौक-रावेत-तळेगांव-चाकण-मंचर-नारायणगांव-जुन्नरमार्गे आंबोली या गावात सकाळी साडेदहावाजता पोहोचली. 

ब्रेकफास्ट टाइम 
जाताना एका ठिकाणी थांबून घरून बनवून आणलेला इडलीचटणीचा नास्ता केला आणि गरमागरम चहा घेऊन बसमध्ये गाण्याची महफील रंगविली त्यात वैशाली पाटील यांनी भगतसिंग यांच्यावरील उत्तम पोवाडा सादर केला तो सर्वानाच आवडला. सायलीचे गाणे  मला ऐकवत राहावेसे वाटते.  रस्त्याच्या डाव्या बाजूने शिवनेरी तर उजव्या बाजूने चावंड हडसर हे किल्ले, गावातील छोटी-छोटी कौलारू घरे, गाई म्हैशी, डोंगररांगा दुरून स्मित हास्य करताना दिसले. निगडीपासून सुमारे १०३ कि मी. अंतरावर आंबोली हे गाव असून इथे पोहोचावयास जवळपास तीन तास लागले. .

आंबोली गावातील हरिभाऊ मोरे नावाचे गृहस्थ वाटाड्या म्हणून सोबत घेतले आणि लीडर्सने ट्रेकविषयी सूचना देऊन ट्रेक लगेच सुरु केला.  थंडगार वाऱ्यासोबत कारवीच्या घनदाट जंगलातून पानांची सळसळ ऐकत एक टेकडी पार केली.  एक टेकडी पार केल्यानंतर दऱ्या घाटातील बलाढ्य खडकांच्या अभेद्य भिंती आणि खाली कोकणचा नजारा अप्रतिम होता.  कोकणात खाली ठाणे जिल्हा असल्याने माझ्या मुंबईच्या  गॅंगमधले गॅंगस्टर्स कोणी दिसतात का हे वाकून बघत होते परंतु सगळे फारच बिझी आहेत असे दिसले म्हंटलं चालूदे त्यांचं.  आम्ही आपले धसई आणि इतर दोन छोट्या धरणांचे नयनरम्य दृश्य डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवून पुन्हा कारवीच्या जंगलात वाट चालू लागलो. .

धसई धरण, दऱ्या घाट आणि कोकण 
दऱ्याघाटाविषयी थोडक्यात सांगायचे तर प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल विविध मार्गांनी घाटमाथ्यावर जात असे उत्तर कोकणातील  कल्याण सारख्या बंदरात उतरणारा माल विविध घाटवाटांनी जुन्नर या घाटमाथ्यावरील बाजारपेठेत जात असे.  या मार्गावर नाणेघाट सारखा प्रसिद्ध प्रशस्त घाट सर्वांना परिचित आहे नाणेघाटट्रेकदरम्यान त्याची माहिती घेतली आहे परंतु दऱ्या घाट थोडासा अपरिचित आहे दऱ्या घाटाच्या रक्षणासाठी दुर्ग आणि धाकोबा हे दोन किल्ले आहेत. असे म्हणतात.  या घाट मार्गाजवळ पळू सोनावळे येथे गणेश गडद ही लेणी आहेत.  अशी माहिती नेटवर उपलब्ध आहे. नाणेघाटा इतका दऱ्याघाट प्रसिध्द नसला तरी ट्रेकर्स लोकांना तो चांगलाच परिचित आहे


कारवीचे जंगल पार केल्यावर एक रॉकपॅच आल्याने थोडीशी भीती वाटली परंतु मला तर तो खडा चढ चढताना मजा आलीथोडा जरी पाय घसरला तरी डायरेक्ट कोकणात उडी जातेलीडर्सने सगळ्यांना  सांभाळूनच  सुरक्षित दुसरा टप्पा पार करवला. .दुसरा टप्पा पार केल्यावर काहीजण क्षणभर विश्रांती घेतात काहीजण फोटोग्राफी करतात आपण मात्र ना बसून विश्रांती ना उभ्याने विश्रांती घेत.  स्वतःही पळतो आणि स्लोमोजसाठी इच्छुक असलेल्यांनाही सॉल्लिड पळवतो.  त्या टप्प्यावरून पायथ्याची गावे, जलाशय, समोरची डोंगररांग असे एकत्र मिळून देखणे दृश्य पाहवयास मिळते.

नानाचा अंगठा आणि जीवधन गड आणि कोकण दिसत आहे. . 
पुणे जिल्ह्यातला जुन्नर तालुका आणि ठाणे जिल्ह्यातला मुरबाड तालुका यांना जोडणारा हा दऱ्या घाट म्हणजे भटक्यांसाठी खास पर्वणीच आहे.  दऱ्याघाटाचं सुरेख दर्शन घ्यायचं असेल, तर धाकोबा  घाटमाथ्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. .आंबोलीच्या  बाजूने  चाल कमी होते म्हणूनच बहुतेक ट्रेकर्स याच बाजूने घाटाकडे येतात.  आम्हीही हाच विचार मनात ठेवून आंबोली गाव गाठले.  जुन्नर परिसरात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जुन्नर म्हणजे पुणे जिल्ह्याचा स्वर्ग जणू.  प्रत्येक भटक्याने आवर्जून पाहावा, असा हा दऱ्या घाट आज काहीसा उपेक्षितच आहे तेच बरे आहे नाहीतर हा कोकण आणि देशावरचा प्रवास सुखकर होण्यासाठी आपण माणसाने नवनवे मार्ग बनवले,  प्रशस्त डोंगररांग  फोडून बोगदे तयार केले, एक्सप्रेसवे सारखे गुळगुळीत रस्तेही बनवले परंतु अनेक वर्षे आपण मागे गेलो तर त्याकाळीही कोकण आणि देश यांना जोडण्यासाठी घाटवाटा निर्माण झाल्याचे आढळते.   निसर्गाची हानी करता आपल्या आधीच्या पिढ्यांनी या वाटा जपल्या होत्या. म्हणे विकास विकास का काय ते करण्याच्या नावाखाली ह्या घाटवाटा मोठे करण्यासाठी मानवाने निसर्गाला हानी पोहोचवून सगळ्याचीच  वाट लावली आहे परंतु तरीही काही घाटवाटांना आजही आधुनिकीकरणाचा स्पर्श झालेला नाही त्यातलाच निसर्गाचा सुंदर अविष्कार म्हणजे दऱ्या घाट होय. .भौगोलिकदृष्ट्या आपल्या महाराष्ट्राचे देश आणि कोकण असे दोन भाग पडतात.  देश आणि कोकण यांच्यामध्ये सह्याद्रीचे कडे उभे आहेत त्यामुळे या दोन भागांना  व्यापारासाठी अथवा  वाहतुकीसाठी हे मोठमोठाले कडे पार करावे लागतात काही ट्रेकर्स दुर्ग ,ढाकोबा, दर्या घाट असा दोन दिवसांचा मोठा ट्रेक करतात अथवा अजून आजूबाजूचे एकदोन गडकिल्ले त्या सामावून घेऊन तीनचार दिवसांचा ट्रेक करतात. तो दमछाक करणारा ट्रेकदेखील  भन्नाट अनुभव देऊन जातो.  आमच्या ट्रेकर मित्रांचे ट्रेकलेख वाचताना मला नेहमी वाटते की अशी मोठी रपेट आपण कधी करणार की ते फक्त स्वप्नच राहणार आहे कुणास ठाऊक??. कोरोनाने सगळ्यांचाच जीव घाबरगुबारा झाला आहे. कोणाकडे जायचे म्हंटले की आपल्याला आणि समोरच्यालादेखील कोरोनामुळे भीती वाटते.त्यामुळे लोक सरळ येऊ नका म्हणतात. कोणाकडे जाणे उत्तमच आहे. परंतु निसर्ग हा एकमेव सोबती आहे कधीही येऊ नका असे म्हणत नाही. आपण जाऊ तेव्हा तो आपले नेहमी हसून स्वागत करतोमाझ्यासारख्याना आरोग्य चांगले ठेवायचे असेल  तर योग्य काळजी घेऊन कोरोनाचे नियम पाळून ट्रेक करत राहणे फारच गरजेचे आहे. .


आपला पहिला नशा कायम ट्रेक आहे आणि तेच रहाणार, त्यानंतर फोटोग्राफी आणि लिखाण असेल. आयुष्य जगायला आपल्या कला आणि छंद पुरेसे आहेत.  आपण कितीही चांगले वागलो भारी वागलो तरी कोणाला पूर्ण समाधानी करू शकत नाही, ना कोणाचे दुःख कमी करू शकत ना कोणाला आपल्या सोबत रहाण्यासाठी फोर्स करू शकत त्यापेक्षा परमेश्वराने आपल्याला इतके सुंदर आयुष्य दिलय त्या आयुष्याला वेळ देऊ आणि स्वतःला समाधानी करू.  काहींचे प्रश्न असतात की हे वेडे काय ट्रेकला जातात तेचतेच करतात???हो तेच तेच करतो परंतु त्यातला आनंद ट्रेक करणाऱ्याला आणि आयुष्य जगणाऱ्याला कसा कळणार ???? आपला आयुष्य जगण्याचा फंडा वेगळा आहे "आपण जाऊ तिथे भाव खाऊ आणि खुश राहू"

"ये जिंदगी किसीके काम ना आयी तो बता गालिब, तुने कभी पिंजरे से आझाद हुए पंछी को उडते हुए देखा है ???

नहीं देखा??? तो मेरे संग एखाद ट्रेक कर फीर सब जुगाड समझमे आयेगा"

कारवीचे घनदाट जंगल आणि एक टेकडी अशी आमची सरासरी ट्रेक चाल सुरु  होती.  दहा महिन्यानंतर मनाला बेधुंद करणारा थंडगार वारा सोबत गोड गप्पा मध्येच डोंगर टप्पा, मला तरी हे सगळं कसं पैसा वसूल जगणं झालं असं वाटत होतं.  इतके चालतोय तरीही ढाकोबाचे ते वरचे टोक काही केल्या दिसेना झाले होते परंतु उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता त्यामुळे हायसे वाटत होते. अडीच तासांच्या पायपिटीनंतर ढाकोबाचे वरचे टोक दिसू लागले त्यामुळे असे झाले होते कधी एकदा वरच्या टोकाला जाऊन सर्व डोंगर सुळक्यांना हाय-हॅलो करतोय.  इतक्या महिन्यांची डोंगरसुळक्यांना भेटण्याची आतुरता शिगेला पोहोचली होती थोड्या वेळातच एक खडा चढ चढून सगळ्यात वरच्या टोकाला पोहोचलो आणि थंड वाऱ्याच्या झोताने मन सुखावून गेले. 


वाटाड्या हरिभाऊ मोरे 

कोणी भगव्यासोबत फोटो काढतायत,  कोणी आडवे पडून कोकणकड्याच्या फील घेतायत, कुणी शांत बसून माझी स्लोमोजसाठी चाललेली धडपड बघून स्मितहास्य करतायत.  मला जास्त उत्सुकता असते ती आजूबाजूच्या डोंगररांगांची इथून कोणकोणते गडकिल्ले दिसतायत ते ऐकायचं असतं आणि कॅमेऱ्यात डोळ्यात, आणि मनात साठवायचं असतं. . इथून खाली कोकणचे दृश्य रमणीय होतेच  शिवाय नानाचा अंगठा, नाणेघाट, जीवधनगड ह्या डोंगररांगा स्पष्ट दिसत होत्या तर बाकीच्या डोंगररांगा धूसर दिसत होत्या.  आठवण म्हणून बॅनर फोटो,  भगव्यासोबत फोटो, स्लोमोज घेऊन इथून लगेच निघालो.. खरंतर इतक्या लगेच निघून माझे तर मन भरत नाही परंतु ग्रुपसोबत चुपचाप चालावे लागते ग्रुप लीडर्सच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे हे माझे आद्य कर्तव्य आहे.  यावेळी आमच्या बसचा चालक कृष्णा देखील गडावर आला होता. .त्याला म्हंटलं, " लेडीज ट्रेक करतात म्हणून ट्रेकवैगेरे सगळं सोप्पे आहे असे समजू नकोस तुला ट्रेक संपल्यावर बस चालवायची आहे." तर तो नुसता गालातच हसत होता शिवाय माझ्या मोबाईल कॅमेऱ्याचा अधून मधून ताबा घेण्याची हिम्मत त्याने केली.  बापुड्याने जीन्सवर आणि साध्या चप्पलवर ट्रेक पूर्ण केला हे मात्र खरे शिवाय परतीच्या वाटेला बसदेखील उत्तम चालवली. सह्याद्रीच्या कुशीत जाऊन माणूस ताजतवाना होऊनच जातो हीचतर सह्याद्रीची खरी खासियत आहे.  सव्वादोनच्या सुमारास वरच्या टप्प्यावरून उजवीकडे एक ते दोन टेकडी उतरून ढाकोबा मंदिराकडे चालावे लागते पुन्हा तो खडा चढ उतरताना घसरणाऱ्या गवतावरून साखळी करून उतरल्यावर थोडे सोप्पे गेले.  चालताना आजूबाजूच्या निळ्याशार डोंगररांगा मनाला शमवित होत्या. .

दुर्ग गड ,अहुपे घाट, सिद्धगड , गोरख आणि मच्छिन्द्रगडचे टोक  दिसत आहे. 
काही अंतर चालल्यावर एका ठिकाणाहून पहिल्या रांगेत, दुर्गगड,दुसऱ्या रांगेत अहुपे घाट, सिद्धगड  आणि दूर धूसर गोरखगड आणि मच्छीन्द्रगडांची टोके दिसत होती.  हे सह्यकडे असेच अबाधित राहोत.  जाताना पुन्हा एकदा कारवीचे जंगल पार केल्यावर एका ठिकाणी मोठमोठाल्या खडकांच्या राशी दिसल्या.मंदिराजवळ गेल्यावर तिथे ७०,८० वर्षांचे तीनचार स्थानिक बसलेले होते ते रोज पायथ्याच्या गावातून मंदिरात जातात. गावचे  लोक किती कणखर असतात. त्यांना त्या खडकांबद्दल विचारले असता ते म्हणाले की पूर्वी दुर्गगडाच्या बांधकामासाठी हे मोठाले खडक वाहतूक चालू असताना बांधकाम बंद झाल्याने ते सर्व खडक वाटेतच सोडले गेले त्यामुळे ते एका ठिकाणी स्थगित आहेत. 

एक तासाच्या पायपिटीनानंतर ढाकोबा मंदिराजवळ पोहोचलो होतो.  मंदिराबाहेर दगडाच्या नंदीची मूर्ती तुटलेली होती तरी ती ओळखता आली.  बाहेर दीपमाळ उभारली होती.  मंदिराचे छत पत्रा आणि कौलांनी अच्छादलेले होते.  पायातील बूट काढून मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन सर्वानी दर्शन घेतले. मंदिराच्या एका व्हरांड्यात सर्वांनी आपापले जेवणाचे डबे काढून पोटात ओरडणाऱ्या कावळ्यांना शांत केले.  शंकराचे मंदिर असून आत गाभाऱ्यात भगव्या रंगाचा देव पाहून विचारले असता स्थानिक म्हणाले की शंकराच्या पिंडीवर तसा आकार स्वयंभू तयार झाला आहे. पाहणाऱ्याला प्रश्न पडावा अशी ती भगव्या रंगाची पिंडी होती. मंदिरातील गाभाऱ्यात बसलेल्या व्यक्तीजवळ दक्षिणा मदत म्हणून दिली त्याच मंदिरात जेवण केले. 
पडझड झालेली नंदीची मूर्ती 


ढाकोबा मंदिरातील शिवलिंगावर स्वयंभू तयार झालेला आकार आणि भगवे शिवलिंग 
थोडावेळ बसल्या बसल्या नवीन मेम्बर्सची ओळख करून घेतली. मंदिराजवळ पाण्याची विहीर आहे त्यात मे महिना सोडून इतर ११ महिने पाणी असते..सर्पतज्ञ निकाळजे काका आणि इतर दोघातिघांनी आमच्या रिकाम्या झालेल्या पाण्याच्या  बाटल्यांमध्ये त्या विहिरीचे पाणी भरून आणले. तहान लागल्यावर तृष्णा शमविणारे चवदार पाणी होते ते. . बॅनर फोटो घेऊन लगेच सव्वाचारच्या सुमारास परतीच्या वाटेला निघालो. 

मावळतीच्या सूर्याचे रंग काही वेगळेच होते.  मला सूर्योदयापेक्षा सूर्यास्त जास्त प्रिय आहेसूर्यास्ताच्या रंगछटा खूप सुंदर असतात. 

सोनेरी संध्याकाळ 

प्रेमात
पडल्यावर प्रेयसी अथवा प्रियकर भेटून जाताना  जास्त हवाहवासा वाटतो अगदी तसाच हा मावळतीचा सूर्य मावळू नये असेच वाटते.  अस्ताला जाताना त्याच्याकडे एकटक पाहताना डोळ्यात टचकन पाणी येते. आपण कितीही  नको जाऊ म्हंटले तरी हा मावळतीचा सूर्य दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने उगवण्याची वेडी आशा लावून कोवळ्या किरणांची मखमली झालर लेवून डोंगराआड लुप्त होतो.. . .



ढाकोबा गुहा 
उतरताना पुण्यातील एक दोन ग्रुपचे लीडर्स भेटले.सकाळी नाष्टयाच्यावेळी मला सह्यांकनची एक मैत्रीण भेटली..सह्याद्रीत कोण कुठे कसा भेटेल आणि सोबत करेल सांगता येत नाही. लीडर राणेंसरानी सकाळपासून ढाकोबा गुहेची आशा लावली होती परंतु ती गुहा काय दिली नाही.अंधार होत आल्याने आता ती गुहा पाहावयास मिळते की नाही अशी शंका आली परंतु उतरताना ती गुहा नजरेस पडली. . ५० पेक्षा जास्त लोकांना सहज रहात येईल इतकी मोठी गुहा होती ती. . अगदी कातळधारच्या गुहेसारखीच होती.  सभोवतालच्या  डोंगररांगा आणि दाट झाडी यामुळे हा ट्रेक आनंददायी ठरतो. 

पावसाळ्यात आंबोली या गावी येणं म्हणजे डोळ्यांना सुखाची मेजवानीच असावी.  आमचे मन लगेच पावसाळी ट्रेकच्या स्वप्नाळू दुनियेत गेले आणि या गुहेवरून पडणारा इथला धबधबा काय प्रशस्थ आणि सुंदर असेल बरे???. पुढच्या पावसात आम्ही इथे नक्की येऊ असे मनात ठरवून त्या गुहेचा निरोप घेतला. ढाकोबा दुर्ग एकदम स्वच्छ होता.  आमच्यातील चार ट्रेकर्स त्या कारवीच्या जंगलातून एक वाट दुसरीकडे गेले परंतु ते हाकेच्या अंतरावर असल्याने आणि गडाचा पायथा अगदी अर्ध्या तासावर असल्याने ते दुसऱ्या वाटेने उतरले परंतु त्यांनी सुंदर अशी गुहा पाहणे चुकवले.  या ट्रेक दरम्यान मनुष्यवस्ती जवळपास नाहीच परंतु घनदाट रान, उंच डोंगर, भन्नाट गारगार  वारा, पानांची सळसळ, पक्षांचा किलबिलाट आणि रानकिड्यांची किणकिण यात आपण रमून जातो पायवाटाही आपल्यासावलीशी बोलत असतात जणू.  ट्रेक कधी संपतो हेदेखील समजत नाही. .हे गुपित मात्र आपल्याला ट्रेकला आल्यावरच समजेल बरं का मित्र हो. जवळपास १३ कि. मी. ची पायपीट संपवून साडेसहाच्या सुमारास हरिभाऊ मोरे वाटाडयाच्या घराजवळ पोहोचलो तिथे एका आजींच्या हातचा चहा पिऊन ट्रेक संपून परतीच्या वाटेला निघालो.अंधार झाला होता परंतु घनदाट जंगलातील त्या खेडेगावामधील लाईटचे दिवे काजव्यांप्रमाणे चममकताना भासले.  कमी ट्रेकर्स असल्याने ट्रेक अजूनच लक्षात राहिला. लॉकडाऊन नंतर वेगळा आणि उत्तम ट्रेक आयोजित केल्याने ट्रेकलिडर्सना मनापासून धन्यवाद. बिबवेवाडी आणि कोथरूड वरून ट्रेकसाठी आलेल्यांना माझा सलाम.  सर्वांनी केलेले छायाचित्रण उत्तम होते भेटू पुढच्या ट्रेकमध्ये गडावर कुठेही जेवणाची सोय नाही.  पायथ्याच्या गावात स्थानिक गावकऱ्यांना आधी सांगितले तर जेवणाची व्यवस्था होऊ शकते.  मे महिना सोडला तर ढाकोबा मंदिराजवळील विहिरीत पिण्याचे पाणी उपलब्ध होते.घनदाट जंगलातून जाताना कायम फूल बाहीचे टीशर्ट आणि ट्रॅकपँट सर्वात उत्तम,  ट्रेकचे ग्रीपवाले बूट गरजेचे आहेतजेवणाच्या डब्यासोबत किमान तीन लिटर पाणी सरबत जवळ असलेले चांगले.  घनदाट जंगल आहे आणि काही ठिकाणी घसारा होतो त्यासाठी डोक्यावर टोपी, रुमाल आणि हातात एक काठी असावी प्रत्येकाकडे किमान पाच फुटी रोप आणि हेड टॉर्च सोबत असावा एक दिवसाचा ट्रेक असला तरी अंधार झाल्यास खूप उपयुक्त आहे. (टीप - आमचे रेगुलर ट्रेकर दिनेश यांना त्यांचा वाढदिवस ट्रेकदरम्यान साजरा करायचा होता काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत त्यामुळे कविता, दिनेश, बोहल्यावर चढायला गेलेला प्रतीकदादा, हर्षदा, राहुल, निलेश टीम, अतिउत्साही श्री श्री शेवाळकर सर, सर्वांना खुप उचक्या असतील.  कारण आमचे न सांगता फोटो काढणारे मेंबर्स आहात तुम्ही.
तुमची फोटोग्राफीची कमी अभिषेकने भरून काढली.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे नवीन लग्न झालेले धडाडीचे लीडर श्री श्री रोहित सर, आकाश, विवेक, स्नेहल आणि इतर सर्व मंडळीनी घरातील गुहेतुन निघून ट्रेकला आलेले चांगले असते. संपन्न, मिलिंद शिंत्रे आणि मित्र, पाटणकर सर, ट्रेक रूटचे अंतर मोजणारा भूषण, सलोनी, रिद्धी, सायली, स्मिता, ममता, मीनल, वैशाली आणि सर्व मंडळींनी ट्रेक उत्तमरित्या पूर्ण करून लीडर्सना उत्तम सहकार्य केले) 
माऊंटन एज ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे रॉक्स. .



15 comments:

  1. अप्रतिम वर्णन!!ट्रेक पुन्हा अनभुवता आला.अविस्मरणीय ट्रेकिंग 👌👌✌

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. अप्रतिम वर्णन!! घरी बसून ट्रेक करून आल्यासारखे वाटले

    ReplyDelete
    Replies
    1. Thanx a lot dear harshu ❤️keep trekking ❤️

      Delete
  4. Jayu ek number. Khup chan vatale vachun. Missing you and nature.

    ReplyDelete
  5. तुमच्या लिखाणातून आमचा हरवलेला (मिस झालेला) ट्रेक गवसला!
    Long live Jayuu! 👍

    ReplyDelete
  6. Excellent decrisption...very well written...

    ReplyDelete