Sunday 21 August 2022

आक्रोश

आक्रोश



आयुष्य आपल्याला नेहमीच आव्हान करीत राहते. आपण माणूस आहोत आणि माणसाला कोणतीही गोष्ट वेळेवर मिळाली नाही किंवा विनाकारण कोणी आपल्या असण्यावर/आपल्या कॅपॅबिलिटीजला मराठीत क्षमता म्हणतो ना आपण ??? हा तर आपल्या क्षमतेवर कोणीही शंका घेतली आणि आपण थोडे तरी चांगले आहोत अशाबद्दलचे स्पष्टीकरण द्यावे लागले की माणूस कधी हताश होतो. तो कधी चिडतो,कधी आयुष्यावर,कधी आपल्या जवळच्या व्यक्तीवर रागवतो, कधी एकटा रहाणे पसंद करतो. बोटावर मोजण्याइतके मित्रमंडळी आहेत तेही दूर,माहेर दूर,समोर जेवण आहे आणि आपण जेवू शकत नाही अशी अवस्था असते माझी. एकट्याने जेवायला कंटाळा येतो. कितीही मनाला समजावले की आपण खूप स्ट्रॉंग आहोत, आपल्याला खूप कामे आहेत,आपण ब्लॉगर आहोत, ट्रेकर आहोत.आपण ह्याव आपण त्याव वगैरे वगैरे. परंतु कधीकधी हे सगळं खोटं आहे असं वाटत रहाते. कोण आहोत आपण?? आपण कोणी नाही आपण एक कलाकार आहोत की जो कोणत्याही क्षणी कोणतीही भूमिका करू शकतो.एखाद्या जोकर प्रमाणे हसण्याची,रडण्याची भूमिका उत्तमरीत्या करू शकणारा मानवप्राणी आहोत आपण.सगळ्यांच्या तालावर नाच म्हंटल्यावर नाचणारे, उड्या मारणारे एक माकड आहोत असं वाटतं. आयुष्यात असे बरेच काही विचित्र घडत असते तेव्हा मला मोठमोठ्याने आक्रोश करावा वाटतो. एखाद्यावेळेस मोठमोठ्याने रडावे वाटते. कधीकधी स्वतःचीच चिड येते.कधीकधी तर डोके आपटावे वाटते.


आक्रोश करून झाला आणि शांतपणे विचार केल्यावर आयुष्यात मागे वळून पाहिले की समजते, अरेच्या आपला आनंद तर छोट्या-छोट्या गोष्टीत आहे मग का आपण इतका त्रागा करतो ?? का आपण अजून कसली आस धरतो ??  का आपण निराश होतो?? का आपण नाराज होतो??का रडतो आपण?? रडणे म्हणजे कमीपणाचे लक्षण नाही किंवा आपण हरलो असा त्याचा अर्थ नाहीये. रडणे म्हणजे कोणाचाही आधार न घेता स्वतःच स्वतःचे अश्रू पुसून स्वतःला आवरणे आणि पुन्हा नव्याने जिद्दीने लढायला तयार असणे. कारण रोज नवा दिवस, नवी आशा,नवी भरारी, नवी संकटे,रोज नव्याने जगणे. ही दुःखे संकटे नसली तर आपल्या जगण्याला अर्थ राहाणार नाही आणि आपली प्रगती होणार नाही. आपण एकाच चौकटीत, एकाच सुखात रममाण होऊन आपल्यात बाहेरच्या जगाची हुशारी येणार नाही. की जी आपल्याला आजच्या जमान्यात आपण कुठेही एकटे फिरलो तेव्हा उपयोगी पडणारी असते. इतक्या मोठमोठ्या संकटाना सामोरे गेलोय. मोठमोठ्या शारीरिक,मानसिक पीडेतून बाहेर आलोय. नेहमीच खरं आणि प्रामाणिक वागून खूप जवळच्या व्यक्ती गमावल्यात. आजही खरेच वागतोय. ज्यांना सोबत रहायचं त्यांनी रहा,ज्यांना जायचे त्यांनी जा म्हणणारी मी आज का सगळ्यांचं शांतपणे ऐकते?? कारण आता कशाचीच आस नाही राहिली,मान्य आहे पैशावाचून आपली खूप कामे अडतात परंतु सगळीकडे पैसा काम करीत नाही. आपण खरं आणि प्रामाणिक वागत राहायचं परंतु इतर कोणाला आपल्या गोष्टी सांगून खऱ्या वाटत नसतील तर एकदा, दोनदा, तीनदा स्पष्टीकरण देऊन मग मात्र गप्प बसावे आणि आपला वेळ स्वतःला देत रहावा. जाणारे जातात रहाणारे सोबत राहतात. मी स्वतः खूप स्वाभिमानी आहे. मैत्री, प्रेम या नात्यांमध्ये मी माझा स्वाभिमान बाजूला ठेवला होता आजही ठेवते परंतु खूप मोजक्या व्यक्तीपुढे. आपण एकटे राहतो तेव्हा ना कसली आस ना बास (आमच्याकडे गावी आईवडिलांना आम्ही आसबास म्हणतो)म्हणजे आपल्या डोक्यावरची आईवडिलांची सावली गेली किंवा आपल्या सोबत कोणीच नसेल तेव्हा कसे आपण जिवाच्या आकांताने एकट्याने जगायला शिकतो. एकटे असलो की आपल्याला स्वतःची मतं निर्माण करायला वाव मिळतो कोणावर अवलंबून आपण राहत नाही. एखादा निर्णय चुकला तरी त्याला आपण स्वतः जबाबदार असतो. त्यामुळे आपण विचार करून निर्णय घेतो आणि सहसा निर्णय चुकत नाहीत.

ठिकाण-कुलाबा किल्ला अलिबाग 

तसं मी खूप स्वाभिमानी आणि मल्टिटास्किंग का काय म्हणतात ते आहे असे काही मित्रमंडळी म्हणतात हा मी अजिबात म्हणत नाही. एकावेळी दहा कामे मी करू शकते.जर दुसर्यांना माझ्यावर इतका विश्वास आहे तर मी दहा काय पन्नास कामे एकावेळी करायला तयार आहे.ट्रेक, ट्रॅव्हल आणि एक वर्षे हाताच्या दुखापतीमुळे खूप दिवसांपासून काही लिहायचं लिहायचं म्हणून राहून जाते ते आज लिहावेसे वाटते.

Instagram, whats app, Facebook, YouTube, एकंदरीत social media म्हणजे नुसती स्पर्धा असते इथे.स्पर्धेचं युग आहे म्हणा. खरंतर इथे घेण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. कितीतरी चांगले मित्र-मैत्रिणी भेटतात, कितीतरी चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात.वाईट गोष्टींचा अनुभव येतो त्यातून आपण अजून चांगले धडे घेतो माझ्यासारख्या मनात, डोक्यात सहज काही आलं आणि लिहावं वाटलं लिहिले जाते.एखादी भावनिक पोस्ट असेल तर त्याचा संबंध आपल्या आयुष्याशी जोडतात.एखादी दु:, विरहाची पोस्ट असेल तर त्याचा संबंध आपल्या आयुष्याशी जोडून मोकळे. हीला काहीतरी त्रास असेल आयुष्यात म्हणून ही किंवा हा असं लिहितो.हिचा किंवा ह्याचा ब्रेकअप झाला असेल म्हणून हिची पोस्ट किंवा स्टोरी अशी असेल. हीचे स्टेटस लै भारी मजेशीर असतात हिचं लाईफ काय भारीये यार. मित्रहो माझं लिखाण इतर कोणाच्याही आयुष्याशी निगडीत नसते, मला आलेले अनुभव किंवा एकंदरीतच माझ्या नजरेतून जे टिपलं जाते, जे मनात साठलं जाते ते लिहिले जाते त्याचा कोणाच्या खऱ्या आयुष्यातील पात्रांशी संबंध असेल तर तो योगायोग समजावा.

मला एखाद्याला जे काही सांगायचं बोलायचं असेल ते स्पष्ट बोलते उगाच गैरसमज नकोत आणि आधीच बोटावर मोजता येतील इतकी असलेली नाती कलुषित व्हायला नकोत. जे आहे ते लगेच आणि समोरच म्हणून तर आपले दोस्त मंडळी कमी आहेत,कारण खरं बोललं तर लोकांना विश्वास बसत नाही किंवा राग येतो.लोकांची मनं दुखावली जातात. मग कोणाशी बोलण्यापेक्षा माझं हक्काचं व्यासपीठ माझा ब्लॉग आहे. आपण सहज कोणापाशी आपलं मनातलं बोलून जातो.त्यांचा अर्थ लोक वेगवेगळा लावत जातात.कोणाशी बोलून त्याच्या बिचाऱ्याच्या डोक्याला ताण देण्यापेक्षा माझ्या ब्लॉगमध्ये मला लिहायला जास्त आवडेल. तेच योग्य आहे. नाहीतर माझ्यासारख्या डोकं नसलेल्या सर्किटला कोण सहन करणार??हाहाहा

मैत्रीण असो, गर्लफ्रेंड असो किंवा बायको असो. एकदा पटवा आणि फक्त टिकवून दाखवा रे म्हणजे झालं. हाहाहा जर ती माझ्यासारखी असेल तर एका दिवसात चक्काचूर, फार तर अर्धा दिवस नाहीतर अर्ध्या तासात नुसता धूर. हे कोरोनामधील मीच लिहिलेले गमतीशीर स्टेटस आहे. हेहेहे जसे तुमचे नखरे तुमच्या आवडीनिवडी तशीच मी आणि माझे नखरे. ज्याला जमेल त्याची मी मितरू नाहीतर मी जाम खतरू.(यमक जुळवण्यासाठी मीतरु आणि खतरू वापरलंय.) कोणाविषयी असलेले गैरसमज दूर करा. काय प्रश्न असतील ते स्पष्ट विचारा. कित्येक नाती गैरसमजातूनच तुटतात. कधी वेळ न दिल्याने तुटतात. काहींना मला वेळ देता आला नाही म्हणून मैत्रिणी गेल्या सोडून. डायरेक्ट मला ब्लॉक कर तुला वेळ नाही अरे हे काय असते ???दहा दहा वर्षे मैत्रीत वेळ दिला नाही का ???तेव्हा मी खरी होते. थोडं मी स्वतःकडे लक्ष दिलं, स्वतःला वेळ दिला, एखाद्या मेसेजला वेळेवर रिप्लाय दिला नाही म्हणून मी वाईट का लगेच??? काहीतरी कामात असेन काहीतरी अडचणीत असेन जे समजून घेत नाहीत त्यांनी खुशाल जावा. सवय आहे आता एकट्याला रहायची.

ठिकाण -जोगफॉल कर्नाटक 

एकतर मला सॉल्लिड भूक लागली की मी जाम हायपर होते. तेव्हा कोणाशी बोलताना कधी चिडले की समजा जयूला भूक लागली आहे.कोकल्ली आहे ती.हाहाहा. मी ऑनलाईन असून कधी कोणाच्या मेसेजला किंवा कमेंटला उत्तर नाही दिलं तर समजा काहीतरी लिखाण किंवा एडिटिंग सुरु असेल. मी असा भडकू व्यक्ती कोणाशी चॅटवर बोलणार मी??? माझी wavelengthखूप कमी लोकांशी मॅच होते. त्यामुळे ठरवून जरी खूप जणांशी बोलले तर रोज ५० फॉलोवर ब्लॉक होतील किंवा मला अनफॉलो करतील. हाहाहा जे अजून मला ओळखत नाहीत त्यांना मी माफ करतेय सध्या. जेव्हा ओळखाल तेव्हा मग फेविकॉल का जोड असेल. मला ओळखतात ते मला काही विचारायच्या आधी दहादा विचार करतात. नाहीतर मग ब्लॉक होतात हाहाहा. 

प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त असतो. प्रत्येकाला असंख्य अडचणी असतात परंतु पुन्हा पुन्हा सॉरी बोलत आलेली व्यक्ती लाचार नसते. तिच्याशी बोलणाऱ्या हजारो व्यक्ती असतात परंतु तिलाही आवड-निवड असते, तिलाही स्वाभिमान असतो. अशा व्यक्ती एक दिवस न सांगता न भांडता आयुष्यातून शांतपणे निघून जातात.वाद टाळायचे असतील तर मी एकतर फोन करून बोलते नाहीतर बोलतच नाही.एखादी पोस्ट लिहिली तर शेअर करते वाचायला देते तेव्हा लोकांना वाटतं लाईक, कमेंटसाठी भिक मागते. छे छे बिलकुल नाही.मी फक्त माझ्या आनंदासाठी लिहिते आणि त्यातील लिहिलेले वाचण्यासाठी देते ते वाचत जावा आयुष्यात कधीतरी उपयोगी पडू शकते.प्रत्येकाला आयुष्यात खूप कामं आहेत,जबाबदाऱ्या आहेत,किडूकमिडूक गोष्टी खूप आहेत ज्या संपता संपत नाहीत. माणसांचं आयुष्य हे सुखदेव दुखदेव या दोघांनी भरलेलं आहे. परंतु त्यातूनही मी मला समजून घेणाऱ्या, मला समज देणाऱ्या, मला वेळ देणाऱ्या व्यक्तींना जमेल तशी वेळ देते, सोबत करते. काही गोष्टी समोरच्याला आवडल्या नाही तर आधी समजावते त्यातूनही कोणी समजूनच नाही घेतलं तर मग मी कोणाला समजून घेण्यासाठी डोकं फोडून नाही घेत. त्यांना न दुखवता शांत रहाणं पसंद करते. पूर्वी जास्त त्रास देणाऱ्याची त्रागा करून,लगेच समोरच्याची पार आयमाय काढून त्याचं पोस्टमार्टम करून मोकळी व्हायची. यातून त्रास आपल्यालाच होतो. त्यापेक्षा आपण आपल्याला रोज होणारा मनस्ताप, त्रास, आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टींना थोडं बाजूला ठेवून ज्या सकारात्मक गोष्टी आहेत जसे आपले छंद, सकारात्मक व्यक्ती, सकारात्मक लिखाण, सकारात्मक प्रतिसाद, सकारात्मक वेळ या बाबींवर लक्ष केंद्रित केलं तर आयुष्य थोडं तरी सहज बनायला मदत होते.

माणसाला पैसाअडका आवडते छंद, नोकरी, व्यवसाय, संसार, या सगळ्या गोष्टी असल्या तरी माणूस प्रेमाशिवाय अधुरा असतो.प्रेमात खूप शक्ती असते.परंतु आजकालच्या धावपळीच्या बदलत्या जमान्यात प्रेमाच्या व्याख्यादेखील बदलत गेल्यात. तू मला काय दिले मी तुला काय दिले?? कॉल नाही केलास??मेसेज नाही केलास?? कॉल नाही उचललास तू?? जयु तुला घमेंड आलीये. माज आलाय. अशा तक्रारी सगळ्यांनी केल्यात. गेल्या ६-७ वर्षात जितक्या लोकांचे कॉल नाही उचलले मी कोणाला उलटे कॉल नाही केले नाहीत त्यांची मी आज जगजाहीर माफी मागते. भाऊ, बहिणी, नातेवाईक सगळ्यांचे गैरसमजाने भरलेल्या रागीट नजरा एखाद्या लग्नसमारंभात किंवा एखाद्याच्या मयतीला  मला पाहायला मिळतात आणि नातेवाईकांच्या कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यास मला रोखतात. नकोत ती नाती, नको ते प्रेम, नको कोणाची सहानुभूती असं वाटते. दोन-तीन वर्षे वॉट्सअँप बंद होते मी कोणालाही ब्लॉक केले नव्हते. तुषारभाऊच्या भाषेत रागाने फेसबुकला केले असेल खूप लोकांना ब्लॉक. माझ्या जिओच्या नंबरवर कॉल करणाऱ्यांनो माझा तो नंबर तीन वर्षे झाली बंद झाला आहे.त्याला मी वेळ नाही दिला रिचार्ज नाही केला बरेच महिने त्यामुळे तो दुसऱ्याचा झाला आहे. हाहाहा बघा ते सिम कार्डदेखील लक्ष दिलं नाही तर आपलं राहत नाही.हा विनोदाचा भाग आहे परंतु विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल  माझ्याकडे फक्त दोनच मोबाईल नंबर्स आहेत. माझ्याबद्दलच्या विनाकारण कितीतरी तक्रारी मला रोज ऐकायला मिळतात. सगळ्यांना उरून पुरून राहणारी एक चांगली व्यक्ती अशी अचानक का शांत राहते?? का बोलत नाही?? याचा विचार न करता असंख्य आरोप प्रत्यारोप केले गेलेत. नेहमी चांगलं वागणाऱ्याच्या वाट्याला जर कायमच हे असंच खडतर आयुष्य येणार असेल तर मग मला बदलायचंच नाहीये. आपण आहे असाच ठीक आहे. मैत्रीत देखील धडामधूम ब्रेकअप होतात यार. जग कुठे चाललंय आणि आपण अजून एकाच झाडाखाली बसून एकतर त्या झाडावर वीज पडायची वाट पाहतो नाहीतर कधी ती फांदी तुटते आणि आपल्या डोक्यात पडते याची वाट पाहतो का?? कोरोनामध्ये कितीतरी जवळची माणसे हे जग सोडून गेलीत. आपला नजरिया बदलूयात ना जरा. जो चांगला बोलला चांगलं बोला.नवीन मैत्री असली की काय ते मेसेज काय ते लाड असतात हाहाहा जुनं झालं की सगळॆ गृहीत धरतात. कधी आपण खरोखर कामात बिझी असतो कधीकधी आपण बिझी नसलो तरी आपण बिझी असल्याचे दाखवतो. एखाद्याला इग्नोर करायचं असेल तर किती कारणं सांगतो आपण. आपल्याला फास्ट फूडसारखी सवय पाहिजे आता. जो कंटाळला, निघाला जा बाबा. एकाच व्यक्तीसोबत आयुष्य घालवणे किंवा एकच व्यक्ती आपल्याला आवडणे. ही गोष्ट जुनी झालीये आता. सोशल मीडियावर रोज नवनवीन चेहरे दिसतात, रोज नवनवीन माणसे भेटत असतात.परंतु प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते. प्रत्येक व्यक्ती प्रामाणिक असतेच असे नाही. काही व्यक्ती खरोखर प्रामाणिक असतात त्या बोलून दाखवीत नाही इतकेच. त्या स्वतःला उगाच मी वाईट आहे, मी पापी आहे असे कोसत रहातात आणि प्रत्यक्षात त्या खूप चांगल्या असतात.हे मला माहित आहे. माझ्यासारख्या पापी माणसाला जास्त प्रेमाची सवय नसते ओ. ही जयू तिच्या आधीच्या अनुभवानुसार रोज सगळ्यांना हाडतूड करतच राहणार आणि तुम्ही माफ करतच राहणार ना??? कराल ना मला माफ??की सोडून जाणार???सगळ्यांना माहित आहे मी भयंकर चिडकी,रागीट आहे परंतु चंचल नाही. हे तुम्हाला समजायला वेळ लागेल.

ठिकाण-रायरेश्वर 

आजच्या जमान्यात प्रेम वगैरे अशा गोष्टींना कुत्रं विचारत नाही कारण ती प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. प्रेम म्हणजे काय गिफ्ट देणे-घेणे नाही. प्रेमात वेळ, आदर, काळजी,शाबासकीची थाप,ओरडा,समज, लाड, राग, अंतर या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. दूर राहून देखील प्रेम करता येते परंतु जास्त दुरावा देखील माणसाला एकटे राहायला भाग पाडतो कारण रोजचा सहवास त्यात नसतो.  माणूस प्रेमाशिवाय अधुरा आहे. परंतु आता हे मैत्री-प्रेम बीम काही नको असे वाटू लागते. ज्यांना एकटे जगायला आवडते त्यांना एकटे सोडतो आम्ही आणि आम्ही देखील एकटे राहतो. प्रेम म्हणजे मैत्री, प्रेम म्हणजे बंधुप्रेम, प्रेम म्हणजे बहिण प्रेम, प्रेम एखाद्या व्यक्तीवर असलेले, प्रेम एखाद्या मुक्या प्राण्यावरचं असू शकतं.प्रेम एखाद्या जागेवर एखाद्या ठिकाणावर असू शकतं. प्रेम एखाद्या कलेवर, कलाकारावर असू शकतं. लेखनावर,वाचनावर प्रेम असू शकतं. एखाद्याच्या चेहऱ्यावर रोज हसू आणणे म्हणजे प्रेम,एखाद्याला एखादया सल्ल्याची, आधाराची कधी उगाच बोलायची नितांत गरज असते ती कोणतेही गिफ्ट देऊन/घेऊन आपण पूर्ण करू शकत नाही. असे माझे स्वतःचे मत आहे. निसर्गाची अतोनात ओढ असणारी, त्यावर जिवापाड प्रेम असणारी मी माणसात नसली तरीही कोणी आपला वेळ मला दिला तर माझी कामं थोडा वेळ बाजूला ठेवून माझा वेळ त्यांना देणं माझं कर्तव्य असते तेदेखील प्रेमच आहे.

माझी रोजची आधारस्तंभ माझी कामवाली मावशीने मला वाढदिवसाला दिलेली साडी घालून मी फोटो काढला की तिचा आनंद गगनात मावेनासा होतो. प्रत्येकाचा आदर करून त्याला आपण आनंद देऊ शकतो.  

एक माझेच उदाहरण घेतले तर गेले काही वर्षे मी रक्षाबंधन सण साजरा करीत नाही. तरीही दूर असलेल्या भावांना पोस्टाने राखी पाठवायची धडपड करत रहाते कारण मी नाते कोणतेही असो मनापासून निभावता आले तरच त्या नात्याला मानते आणि नाते न तुटण्यासाठी प्रयत्न करीत रहाते. दरवर्षी भावांना राखी मिळाली किंवा नाही मिळाल्याचा किमान मेसेज काहीभाऊ करतात. काहीजण ती तसदीसुद्धा घेत नाहीत.यावर्षी मी  वेळेअभावी ना पोस्टाने राखी पाठवली ना Myntraवरून पाठवली. कोणाला काही वाटू दे यावर्षीपासून मी ठरवले आहे की जेव्हा मी प्रत्यक्ष भेटेन तेव्हाच राखी बांधेन. राखी पौर्णिमा म्हणजे "लोकांचा सण" असं मी मानते. यावर्षी राखीपोर्णीमेच्या दिवशी आधीपासूनच थोडी तब्बेत नरम होती सकाळी उशीरा उठून आंघोळ आवरून श्रीकुष्णाला राखी बांधून आणि नैवेद्य दाखवून मी स्वतः जेवण करून पुन्हा झोपून गेले. संध्याकाळी उठून पहाते तर भावाचे इतके फोन होते आणि मेसेजेस होते की मी तुझ्याकडे येत आहे.आधी मला वाटलं तो मस्करी करत आहे.म्हणून विडीओ call kela तर भाऊ शिवनेरीमधून येत होता तेव्हा कुठे मला खरं वाटलं.आनंदाची आता सवय नाही राहिली.तरीही चेहऱ्यावर हसू येत होतं. घरात असलेला नविन ड्रेस घालून मी आवरून घेतलं. रात्रीच्या साडेनऊला भाऊ डायरेक्ट दारात उभा. मला कोणी असं सरप्राइज दिलेलं जास्त आवडतं.  हल्ली काही वर्षे मी इतरांना सरप्रायजेस देणे बंद केलंय. कोणालाही विचारल्याशिवाय भेटायला जाणे बंद केलंय. कोणाला आपण आवडतो  नाही आवडत. उगाच बळच मांडीवर जाऊन बसा आणि ओरडा खा, थोबाडीत बसल्यासारखी वाटते मला. इथून पुढे कधीच कोणाला सरप्राईज देणार नाही. सगळ्यांना असे एक सरप्राईज असेल की मला सगळे शोधत रहाणार याची खात्री मी आजच देते.


हा, तर काय म्हणत होते मी ??? कितीतरी वर्षांनी राखी पौर्णिमेच्या दिवशी भाऊ राखी बांधून घ्यायला आला हेच माझ्यासाठी खूप होते. दिवसभर झोपून रडून ओढवलेले डोळे तीनचार पाण्याने स्वच्छ धुवून घेतले मी भावाला औक्षण करून राखी बांधून घेतली. आम्हीच आमचं फोटोशेशन केलं. लहानपणीच्या आठवणी काढत गप्पा मारत एकत्र जेवण केलं. 


मला सगळे भाऊ सारखेच. देव माझ्या प्रत्येक भावाला निरोगी आयुष्य देवो प्रत्येकाला आयुष्यात जे हवे ते देवो आणि सुखी ठेवो. भावांनो आयुष्यात स्वतःची खूप प्रगती करा परंतु आईवडील, भाऊ-बहिणीला विसरू नका. लहानपण डोळ्यासमोर आलं की डोळ्यात आजही पाणी येते. इतकंच सांगेन माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. आज जो कुणी माझ्यासाठी वेळ काढून येतो त्याला मी माझा वेळ देते. भाऊ आला की मग आमचं एकत्र जेवण असो, एकत्र बसून गप्पा, एकत्र चालायला जाणे असो. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे आम्ही करत असतो. थियेटरमध्ये फारसे चित्रपट न पाहणारे आम्ही यावेळी अक्षयकुमारचा रक्षाबंधन चित्रपट पहिला. चित्रपटापेक्षा सोबत वेळ घालवणे जास्त महत्वाचे. 

ठिकाण - थियेटर 

मी भावाच्या केसांना मेहेंदी लावणार तो माझ्या केसांना तेल लाऊन मसाज करणार. कारण आम्ही मल्टिटास्किंग का ते आहोत. हाहाहाहा. मी त्याला माझी बहीण समजते आणि तो मला त्याचा भाऊ समजतो. पण म्हणून आम्ही भांडणं करीतच नाही असे बिलकुल नाही हा. फक्त लहानपणासारखे मी त्याला नखांनी बोचकारीत नाही इतकेच. हाहाहाहा. कधीकधी राग आला की कित्येक दिवस आम्ही बोलत नाही परंतु कॉल आला की जसे काही झालेच नाही असं असतं आमचं 😂 असेच आपण प्रत्येक नात्यात केले तर किती नाती टिकून राहतील. मी असे हल्ली करते आज झालेला वाद, अबोला दुसऱ्या दिवशी मी शिल्लक नाही ठेवत. असे किती दिवसांचे आपले आयुष्य असणार आहे?? हे कोणालाच माहित नाही. रोज भांडू आणि दुसऱ्या दिवशी सगळं विसरून पुन्हा बोलू. राखीला आलेल्या भावाला दोन दिवस थांब म्हणून आग्रह केला आणि बिचारा त्याची काम पुढे ढकलून थांबला २ दिवस. मला खूप समाधान वाटलं. आयुष्यातली हीच अशीच गिफ्ट मला जास्त आवडतात.

दोन दिवस पटापट कसे गेले मला समजलेदेखील नाही. दोन वर्षांपूर्वी आम्ही असेच अचानक त्याची कार घेऊन दिवाळीदरम्यान आक्षी बीचला गेलो. तिथे दोन दिवस राहून फक्त बीचवर खेळ, समुद्र किनाऱ्यावर फेसाळून आदळणाऱ्या लाटांच्या आवाजात शांतगप्पा, शहाळी प्या, वैभवच्या कॉटेजला जा, परीसोबत गप्पा मारा हेच आमचे रूटीन असे.
स्वतःच्या कारवर असे उभे रहा मी फोटो काढतो असं म्हणणारा एकतर भाऊ असतो किंवा मित्र असतो. 


आयुष्यात त्याच-त्याच रूटीनचा कंटाळा येतो मला तेव्हा एकतरी बदल मी स्वतःला घेते आणि सोबत असेल कोणी तर त्यालादेखील देते. माझ्यासोबत असेल त्या व्यक्तीला  फोन च्या दुनियेतून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करते. माझा एक नियम असतो बाहेर गेलं की मी कोणाचंच कॉल नाही घेत,  ना कुणाला कॉल करत. यावर्षीचा राखीपौर्णिमा दिवस खूप चांगला गेला माझा. मनापासून धन्यवाद रूप्या. 

जो तो आपल्या-आपल्या आयुष्यात सतत व्यस्त असतोच परंतु थोडा वेळ आपल्याला वेळ देणाऱ्याला दिला तर समोरची व्यक्ती बदल्यात प्रेम आणि खूप साऱ्या दुवाच देते. मला आज हे म्हणायचंय आहे की आपण आयुष्यात कितीही व्यस्त असलो तरीही आईवडील आणि आपल्याला वेळ देणाऱ्या काही प्रामाणिक व्यक्ती असतात त्यांना आवर्जून वेळ द्या त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, मनातली सल असेल ती सांगा.आजकाल कोणाला कोणाच्या गोष्टी ऐकायला वेळ नसतो. तरीही कोणी ऐकणारे असेल तर मुकेपणा सोडा आणि भरभरून बोला. अशा व्यक्ती गेल्या की पुन्हा पुन्हा मिळत नाहीत.

अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की जेव्हा आयुष्यात आक्रोश करू वाटेल तेव्हा एकदा मागे वळून बघा. मी कधीही मागे वळून पाहणारी आजकाल मागे वळवून पहाते. साधारण वर्षांपूर्वी २०१९ साली मला ट्रेक, ब्लॉग, फोटोग्राफी यात सातत्य यासाठी "माऊंटन ए ऍडव्हेंचर अँड वाईल्ड ट्रेल्स पुणे" यांचेकडून ऍप्रिसिएशन म्हणून एक छोटी ट्रॉफी मिळाली होती. ध्यानीमनी नसताना असं काही घडलं की आपण जगात भारी माणूस असल्यासारखे वाटते. धन्यवाद माऊंटन एज ग्रुप. रोहित सर, मंदार सर, राणे सर, साने सर तुमचे खूप आभार एक शाबासकीची थाप खूप मोठे सामर्थ्य आणते आपल्यात. तेच सामर्थ्य मला महाराष्ट्रातील नेहमीपेक्षा थोडे कठीण ट्रेक करण्यास उपयोगी पडले. त्यामुळेच मी डोंगरयात्रासारख्या वेगळ्या ट्रेकग्रुपसोबत महाराष्ट्रातील मानाचे समजले जाणारे काही ट्रेक करू शकले. त्या ट्रेक दरम्यान वेळोवेळी प्रोत्साहन देणारे ट्रेकलीडर मनोज सर,(बापू) रवी सर ग्रेटच आणि पूर्ण ग्रुपच ग्रेट आहे.  त्या ट्रॉफिकडे आज मी पहिले की जाणवते आपण फक्त रागीट, चिडका नाहीये. मनात आणलं तर हा वेडा खूप काही करू शकतो. असाध्य गोष्टी साध्य करून कुठून कुठे पोहोचलोय. तरीही मी अजून साधी व्यक्ती असून माझे पाय जमिनीवरच आहेत


अनेकदा वर्तमानपत्रात माझे ट्रेकलेख आलेतध्यानीमनी नसताना फूडीलेख सुद्धा आलेत. दिप्ते, भाग्यश्रीआका,गीतू,संध्या अर्चना, शिल्पा, पल्लवी आणि सर्वच फुडी मैत्रिणींनो मनापासून धन्यवाद. माझ्या आयुष्यातला प्रत्येक व्यक्ती ग्रेट आहे. मग तो कोणीही असो.  तो ट्रेकर असो, ब्लॉगर असो, फोटोग्राफर असो, फेसबुक, इंस्टावर भेटलेले मित्र असो, मैत्रीण असो, सोडून गेलेली मित्रमंडळी असो,शेजारी असो,कामवाली असो,माझ्या ब्लॉगचा फॅन असो सगळेच भारी आहेत आणि त्यांची मी आभारी आहे. आपण यश मिळवतो, मानसन्मान मिळवतो हे खरं आहे परंतु  त्यानंतर वेळ देत नाही म्हणून काही व्यक्ती  सोडून गेल्या हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे मी पेपरला ट्रेकलेख देणे,फूडी लेख देणे हे सगळं सगळं बंद केलंय. गेलेल्या व्यक्ती परत कधीच येत नाहीत परंतु मी माझ्याबाजूने प्रयत्न केला होता. दुनिया इकडची तिकडे होतो आपण आपले आयुष्य शांतपणे चालू ठेवायचं. 


कोरोनाकाळात योगा शिकवणारी अनु ग्रेट. कोरोनाकाळात तुषार,सुरजचे यांचे ठेवणीतले वेगवेगळे ब्लॉग वाचून नवी उमेद मिळाली होती. ही माणसे तर जगावेगळीच. आयुष्यात नैराशेतून बाहेर काढून पुन्हा नव्याने आयुष्य जगायला लावणारी मीनल ग्रेट, जवळ फार पैसे नसताना अनेक जुगाड करून बहिणीसाठी काहीकाही आणून देऊन मनस्तापातून बाहेर काढून फिटनेस सांभाळ म्हणणारा माझा भाऊ ग्रेट. आपण एकटे असलो तरीही त्या आयुष्यात साथ देणारे अनेक हात असतात. मी ज्यांच्याकडून प्रेरणा घेते, सल्ला घेते, माहिती नसलेल्या गोष्टींची माहिती त्यांच्याकडून घेते त्यांचादेखील मी मनापासून आदर करते. मित्र हो, मनापासून धन्यवाद. जे माझे निंदक आहेत, मला सतत नावे ठेवतात त्यांची तर मी शतशः ऋणी आहे. मला चॅलेंज करणाऱ्या व्यक्तीमुळेच तर मी रोज नवनवीन गोष्टी शिकते आणि शिकत रहाते. माझी मनाची भूकच छोटी आहे. ना मला पैशाची हाव, ना कशाची हाव फक्त मला खाता येतो बराच भावहाहाहाहा  छोटे आयुष्य, साधं आयुष्य, थोड्या व्यक्ती यातच मी माझं सुख मानते आणि समाधानी रहाते. आयुष्यात कधी माझ्याकडून बोलताना वागताना,चिडताना,उगाच हक्क गाजवताना माझं काही चुकलं असेल तर मित्र-मैत्रिणींनो, नातेवाईकांनो मला मनापासून माफ करा. मी अगोदर होते तशीच आहे फक्त तुमच्यापासून दूर आहे इतकंचदूरच असेन. 
क्रमशः ..

माझा भाऊ 


 

 


8 comments:

  1. फार मनस्वी आहात तुम्ही जयू मॅडम.. तुमच्या स्वभावातला अजून एक विस्मयी पदर उलगडलात या मनोगतातून..
    खूपच आतून आलेलं आणि मनाला भिडणारं लिखाण..

    ReplyDelete
  2. खूप छान 👍अगदी मनापासून व्यक्त झालीयेस तू जयू

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलं आहेस अगदी निर्मळ निखळ झरा वाहतो तशीच तुझी लेखणी मस्त आहे , शिवाय तुझा मधेच डोकावणारा sence of humar , (मीतरु आणि खतरु खूप आवडलं )
    जशी आहेस तशीच छान आहेस तू , तुला ओळखणारे नेहमीच तुझ्या पाठीशी असणारच आहेत , असंच बिनधास्त आणि मनमोकळं व्यक्त होत जा ,,,
    श्री गुरुदेव दत्त 🙏

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you so much Bhai 😊
      गुरूदेव दत्त 🙏

      Delete