Tuesday 23 August 2022

सावली

सावली

आपण जन्माला येतो एकटे जातोही एकटेच. ना येताना काही घेवून येत ना जाताना काही घेवून जात. लहान असताना आपण निरागस असतो.जसजशी अक्कल यायला लागते तसतसे आपण हुशार होण्याऐवजी चिंताग्रस्त होत जातो. कळत नकळत निरागस बेफिकीर जगणं विसरून जातो.लहानपणी अभ्यास,वयात आलो की मग मैत्री प्रेम,पुढील शिक्षण,पैसा कमावणं नोकरी किंवा एखादा व्यवसाय करून सेटल्ड होणं,मग चुकून लग्न केलं तर तो संसार आणि नुसत्या चिंता असं सगळ्यांच्या दृष्टीने एकंदरीत आयुष्याची व्याख्या असते.अरे कशाला या चौकटीतच आपण  बसतो??? बाहेर पडा यातून.रोज जेवण पोटाची भूक, रोज प्रेम, मनाची भूक,शरीराची भूक आहे ती वेगळीच चिंता, ही प्रत्येक गोष्ट जशी त्रासदायक आहे तशी आनंददायकही आहे.मग आपण का स्वतःला एकटं आणि दु:खी समजतो. मानसिक आधार देणारी व्यक्ती, भरभक्कम सोबत करणारे असले तरी ते सोडून आपण दुसऱ्याच चिंतेच्या दुनियेला जवळ करून आताचा क्षण वाया घालवतो. गरज नाही या सर्वांची. समजलं तर जगभर चिंता आणि मानलं तर मूठभर चिंता. सर्वगुणसंपन्न सर्वात सुखी असं कुणीच नाही या जगात. किती सुंदर क्षण वाया घालवून कुढत बसणारे कमकुवत मनाचे आहोत का आपण?? बिलकुल नाही. 
मी ट्रेक दरम्यान हात पाय नसलेल्या व्यक्ती कळसूबाई शिखराच्या माथ्यावर स्वतःचेच रेकॉर्ड मोडण्यासाठी शिखरावर आलेल्या पाहिल्या,त्यांच्याशी मी गप्पा मारल्यावर कळतं आपल्याजवळ हात पाय आणि आपली सर्व इंद्रिये शाबूत आहेत.आता ते फोटो मला सापडत नाहीत नाहीतर टाकला असता इथे. मनाने खचून जावून नाही चालत, माझ्याकडे तर जादूची कांडी आहे असं बरेच जण म्हणतात. जयुशी बोललं की जादू झाल्यासारख्या अडचणी छूमंतर होतात. मन हलकं होतं. मग काही जवळच्या व्यक्तींच्या नजरेत मी कुठेतरी कमी पडते आहे असं वाटतं मला. मी तर वर्षानुवर्षे काही गोष्टीत म्हणजे नातीगोती अशा गोष्टीत माझं मन मारून इतकी मजबूत दगडी झाले की मला आता कोणी पुन्हा तोडू शकत नाही. परंतु मी अनेक मनांना जोडणारा दुवा आहे आणि हा माझा आत्मविश्वास मी कधीही तुटू देत नाही.मी दगड असल्याने मला चांगलं माहिती आहे की सगळं क्षणिक आहे. मैत्री,प्रेम,संसार,घर,व्यवसाय, वस्तू,कपडे सगळं क्षणिक आहे.आपण पुढच्या क्षणाला असू नसू हे माहीत असताना कसली चिंता करतो आपण??हजारो क्षणांचे निसर्गाचे,माणसांचे,प्राण्यांचे,पक्षांचे,फुलांचे फोटो काढतो. त्यात जान टाकतो आपण. जीव ओततो, आपण काही लिहीतो त्यात जीव ओततो पण स्वतःत जीव न ओतता उगाच उद्याची चिंता करतो.आपल्यात जीव ओतायला शिका.जे आपल्याला जीवापाड जपतात त्यांना समजायला का वेळ लागतो माणसाला?? जे वाईट त्रास दायक आहे तुम्हाला एकटं पाडणारं आहे त्याला पुर्ण विराम द्यायला शिका. सगळं क्षणिक असते. जी गोष्ट आनंद देते तीच करा.जास्त लोड नका घेऊ. रोज खाण्यापुरतं कमावतो ना तेवढंच बघूयात.सगळी स्वप्न थोडा वेळ बाजूला ठेवून जगायला शिका.कारण ती स्वप्नं आपली आहेत आपल्यासाठी आहेत. ना की लोकांना दाखवून द्यायला की बघा मी कशी जगते किंवा कसा जगतो ते. कोणी आपल्याला कमजोर समजेल याचीदेखील चिंता करू नका. बिनदहास्त जगा मग एकटं एकटं वाटणारच नाही. ज्यांना आपण महत्त्वाचे वाटत नाही ती माणसं सोडून द्या. पण बिनधास्त जगणं सोडू नका. इतरांना त्रास देत नाही ना आपण कारण तो आपला स्वभाव नाही मग स्वतःला तरी का करून घ्यायचा???का का का??
ना काका वाचवायला येणार ना मामा. ना आई ना वडील, ना कोणी नातेवाईक. पण एखादी तरी व्यक्ती असते आयुष्यात ती सावलीसारखी तुमच्या सोबत असते कारण सावली सुखदुःखात कधीच साथ सोडत नाही. तिला विचारात धरा कोणी सांगावं एक व्यक्ती हजार लोकांपेक्षा जास्त चांगल्याप्रकारे सोबत करेल. प्रत्येकवेळी आपल्याजवळ एक हिरा असतो तो सोडून आपण दगडं जमा करतो आणि हिऱ्याला क्षुल्लक समजतो. प्रत्येक व्यक्तीतील क्षमता ओळखा आणि बाकीच्या चिंता सोडून जगायला शिका. बेफिकीर जगायचं. कोणाला काही फरक नाही पडला पाहिजे,असं जगा. एखादी व्यक्ती आपला मित्र असेल, मैत्रीण असेल, एखादा समुपदेशक असेल एखादी कोणीही व्यक्ती असेल.जग ओळखून काय उपयोग आपला???जगातलं कोण जवळचं आणि आपल्यावर बेमतलब जान देणारं आहे ते ओळखता आलं पाहिजे. आपली हुशारी इथे वापरून स्वतःला मनाने कणखर बनवा.,देवावर विश्वास असेल तर देव आपल्या आयुष्यात सकारात्मक लोक पाठवतो ती ओळखून त्यांच्याशी सतत बोला खूप फरक पडतो. आयुष्य क्षणात बदलते.आपली कामे पटापट होतात.माझा स्वतःचा अनुभव आहे हा. फक्त शांत नको बेफिकीर जगायला शिका. भूतकाळातील भूतं विसरून भविष्याची चिंता न करता फक्त वर्तमान जगा. बघा काय फरक पडतो का?? जर मी कोणालाच त्रास दिला नाही तर परमेश्वर माझं काहीच वाईट करणार नाही.जे काही घडते ते नेहमी चांगल्यासाठीच घडते‌. सर्व प्यादी परमेश्वर वरून हलवत असतो.  हा माझा प्रत्येक वळ्णावरचा अनुभव आहे. जसं सुख क्षणिक असतं तसंच दु:खदेखील क्षणिकच असतं. मग क्षणिक सुखाला जवळ करा.क्षणिक सुख म्हणजे शरीर सुख नव्हे. क्षणिक सुख म्हणजे जे क्षणात आनंद देते ते क्षणिक‌. कशाला सारखं दु:ख कुरवाळत बसायचं. शांत विचार करा आणि क्षणात हा बदल आपल्यात घडवा मग जादू बघा. आपली सावली सतत आपल्या सोबत असते हे विसरू नका. 
-जयु पाटील
२३-०८-२०२२


 

No comments:

Post a Comment