Saturday 27 August 2022

चहा बिस्कीट

 

चहा बिस्कीट 


चहा आणि बिस्कीटचं नातं खूप वेगळं असतं इतर बिस्किटांपेक्षा पारले जी बिस्कीट चहात पटकन विरघळते. पारले-जी बिस्कीट तर पाण्यातही लवकर विरघळते. चहा गार असो गरम असो बिस्कीट आपला विरघळण्याचा नियम बदलत नाही. मग आपण का आपला चांगुलपणा सोडून देतो?? हजारो स्वभावाची हजारो माणसे भेटतील कोणी आपल्याला प्रेम देतील कोणी, कोणी आपलं मन दुखावतील, कोणी आपल्याला प्रेरणा देतील, कोणी आपल्याला धडा शिकवतील, कोणी आपली सोबत करतील, कोणी आपल्यातील चुका दाखवतील. आपण सगळ्यांचं सगळं ऐकून घ्यायचं शांतपणे विचार करायचा आणि आपल्याला जे जमेल आपल्याला जे पटेल ते करण्याचा प्रयत्न करायचा.


एक बिस्कीट विरघळलं की दुसरं आधीच हातात तयार ठेवायचं. कारण पहिला प्रयत्न कधीच यशस्वी होत नाही. हा माझा अनुभव आहे. बिस्कीट बदललं तरी विरघळणायचा नियम तोच राहणार त्यापेक्षा आपण इतक्या जलद रीतीने ते बिस्कीट चहात डुबवून चहातून बाहेर काढायचं की ते बिस्कीट विरघळणारच नाही. आयुष्यात आपल्याला सतत असे अनुभव येत रहातील म्हणून कधीच निराश होता आपण सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. मी तरी सतत प्रयत्न करते. नवनवीन गोष्टी शिकत रहाते. ट्रेकिंगमुळे अनेक प्रकारची लोक मला भेटतात. कोणाला आपण आवडतो कोण आपल्याकडून प्रेरणा घेतो. कोणी आपल्या ट्रेक ब्लॉग या पॅशन कडे पाहून अनेक अनुमान लावतात. काहींना वाटते मला काम नाहीत म्हणून मी हे करत असेन. काहींना वाटते कशाला उगाच ते फोटो काढायचे?? कशाला उगाच ते ब्लॉग लिहायचे?? कशाला उगाच ते एडिटिंग करून त्रास घायचा.?? मग घरातली काम पण मीच करते जीwaaपलीकडे जाऊन मग मी माझ्या छंदांना देखील प्राधान्य दिलं तर बिघडलं कुठे??घरातली जी काही काम असतील ती माझी, ट्रेक मी करणार, ब्लॉग मी लिहिणार, मग घोडं अडतंय कुठे??? एकाच साच्यात बसणे, सरसकट सगळ्यांना एकच नियम लागू करणे  मला आवडत नाही. तो माझा स्वभाव नाही. मला सतत काहीतरी बदल हवा असतो. तो बदल आपला आपण घायचा. जगात प्रचंड संधी आणि निरनिराळ्या गोष्टी आहेत त्या शिकण्यात आपला वेळ सत्कारणी लावणे मला आवडते.


एक गोष्ट करायला गेलो आणि समजा जमली नाही किंवा त्यात आपल्याला यश आले नाही तर दुसरी गोष्ट आपल्या मनात डोक्यात तयार पाहिजे. रिकामं डोकं सैतानाचे घर असते हाहाहा. त्यातही चांगल्या सैतानाला आपल्या डोक्यातील घरात घेतले तर ते सैतानदेखील हसत हसत त्याचा सैतानपणा सोडून हसत रहाते.  आजच्या डिजिटल युगात तर नुसत्या संधीच संधी. आपण कोणत्या संधीचे सोने करायचे ते आपल्या हातात आहे.चहात एक बिस्कीट बुडवताना एक बिस्कीट तीन बोटात तर दुसरे बिस्कीट हातात ठेवूनच द्यायचं. एक बिस्कीट विरघळले की दुसर बिस्कीट विरघळायच्या आत चहातून बाहेर काढता आले पाहिजे. तरच चहाची गंमत आणि आयुष्याची रंगत कळते. आपल्या आयुष्यातील प्रत्येक वळणावरचा अर्थ शोधायचा असेल तर . पु. काळेंची वाक्ये जरूर वाचावी खूप गोष्टींचा उलगडा आपोआप होतो. आयुषयात एक वेळ अशी येते की जेव्हा प्रश्न नको असतात फक्त साथ हवी असते.

पु काळेंची वाक्ये वाचली की प्रत्येक वाक्यात किती गहन अर्थ आहे ते समजते.

अश्रुंमागचं कारण काहीही असो तेथे फक्त सांत्वन हवं असतं.

सौख्य ही गोष्ट अशी आहे की जी फक्त दिल्यानेच मिळवता येते.

मोगऱ्याचे फुल ओंजळीत घेतले की त्याचा गंध शरीराला आणि मनाला प्रसन्न करून जातो सहवासातील माणसांचेदेखील असेच आहे. काही माणसे काही क्षणातच मनाला खूप आवडतात तर काही माणसे कितीही सहवासात राहिली तरी त्यांची आतून ओढ नसतेच. चेहरा बघण्यापेक्षा नेहमीच समोरच्याच्या मनात उतरून बघावं. शोधूनही तिथे माणूसपण सापडत नसेल तर त्याचं सुंदर दिसणेही चांगलं वाटत नाही. शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून रहाते. शरीराला वय असतं तर मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा,शालीनता,प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीहवीशी वाटते. म्हणून बाहेर लक्ष दिव्यांची आरास असली तरी आपण देवघरातील शांत तेवणाऱ्या समईपुढे नतमस्तक होतो. शांत तेवणारी समई मन प्रसन्न करते आणि आपण नेहमी सकारात्मक विचार करतो. आयुष्यात अशी शांत बोलणारी शांत वागणारी माणसे भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावे. आपल्या आवडत्या माणसांचे आपल्या सोबत असणे ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे.ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजकाल अशी माणसे फार कमी भेटतात. भेटली तर हळुवार जातं करून ठेवावीत. कदाचित पुन्हा भेटतील ना भेटतील.

एखादे पुस्तक वाचताना मी ते पुस्तक नुसते वाचत नाही,त्यातील चांगल्या गोष्टींचा आयुष्यात अवलंब करते आणि वाईट गोष्टी काय आहेत त्या समजून त्यातून खूप धडे घेते. कधी चूक आपली असते कधी चूक समोरच्याची असते परंतु माफ करत गेले तर आयुष्य खूप सोपे होते. किती जणांना आपण डोक्यात ठेवून स्वतःला त्रास करून घेणार?? त्यापेक्षा सरसकट सगळ्यांना माफ करीत गेलो तर आपलेच मन हलके होते आणि आपण पुढे जायला मोकळे होतो. नाहीतर एकाच ठिकाणी अडकून पडून स्वतःचा जीव मारत रहातो, कुढत राहतो. असे करण्याने आपल्या आजूबाजूचे वातावरण गढूळ होते आणि अनेकांची आपल्याबद्दलची असलेली चांगली मतेदेखील बदलायला वेळ लागत नाही. म्हणून प्रत्येकाला माफ करत जावे आणि पुढे जावे. चहात बिस्कीट टाकताना एक बिकिस्ट विरघळलं तर विरघळूदे दुसरं बिस्कीट कायम तयार ठेवावे. अशा मताची मी आहे बाकी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. 


व. पु. काळेंचं एक सुंदर वाक्य, "व्यवहारात येणारी संकटं आणि समस्या निवारण्यासाठी जेवेगळं रसायन लागतं त्याला मित्र म्हणतात. ऐन वैशाखात "वर्षा" ऋतूची साश्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशोब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत नेमकेपणा देतो, तो मित्र. 


 

x

No comments:

Post a Comment